सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद सोहिबुल फिक्री या जोडीचा पराभव करत पहिल्यांदाच सिंगापूर ओपनच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. Pudhari
स्पोर्ट्स

Satwik Chirag Singapore Open | सात्विक-चिरागने कोरले सिंगापूर ओपनवर नाव! इंडोनेशियाच्या जोडीचा केला पराभव

Satwik Chirag Singapore Open | दोन वर्षांनंतर संपवला जेतेपदाचा दुष्काळ

पुढारी वृत्तसेवा

Satwik Chirag Singapore Open

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या माजी नंबर वन जोडीने अखेर आपला जेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. या स्टार जोडीने पहिल्यांदाच सिंगापूर ओपनच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. सात्विक-चिरागने पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद सोहिबुल फिक्री या जोडीचा पराभव केला. आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमधील सुवर्णपदक विजेत्या या भारतीय जोडीने दोन वर्षांतील आपले पहिले आणि जागतिक टूरमधील एकूण नववे जेतेपद पटकावले आहे.

सिंगापूरमध्ये भारताने प्रथमच जिंकले दुहेरीचे जेतेपद

१ तास १३ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सात्विक-चिरागने इंडोनेशियन जोडीचा १८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव करत आपले तिसरे 'सुपर ७५०' जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीसाठी हे जेतेपद अत्यंत खास आहे, कारण सिंगापूर ओपनमध्ये दुहेरीचे जेतेपद जिंकणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

२०२४ मध्‍ये जिंकले होते थायलंड ओपनचे जेतेपद

यापूर्वी सात्विक-चिरागच्या जोडीने २०२४ मध्ये थायलंड ओपनचे जेतेपद जिंकले होते. त्यानंतर ही भारतीय जोडी चार वेळा अंतिम फेरीत पोहोचली, पण त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर सिंगापूर ओपनमध्ये या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत जेतेपदाचा दुष्काळ संपवला.

तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियन जोडीचा केला पराभव

अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या या जोडीविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. या प्रतिस्पर्धी जोडीविरुद्ध त्यांचा शेवटचा पराभव जानेवारी महिन्यात मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत झाला होता. सिंगापूर ओपनच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पहिल्या गेममध्ये मागे पडल्यानंतरही, भारतीय जोडीने आपल्या खेळाचा वेग वाढवला. त्यांनी लांबच्या रॅलींमध्ये वर्चस्व गाजवत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियन जोडीविरुद्ध सामन्याचा नूरच पलटवून टाकला.

सात्विक-चिरागने साजरा केला जल्लोष

सामन्याचा निर्णायक गुण मिळताच सात्विक आणि चिराग आनंद साजरा करण्यासाठी थेट कोर्टवरच झोपले. यानंतर सात्विकने लहान मुलासारखा आनंद व्यक्त केला, तर चिरागने उत्साहात मोठी गर्जना करत आपल्या सहकाऱ्यावर उडी मारली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी कोर्टवर डान्स केला आणि प्रदीर्घ काळानंतर पोडियमच्या सर्वोच्च स्थानावर (विजेतेपदाच्या मंचावर) पुनरागमन करण्याचा मनमुराद आनंद लुटला. हा विजय भारतीय जोडीसाठी एका शानदार आठवड्याचा सुवर्णकाळ ठरला. त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या विद्यमान जागतिक विजेत्या आणि अव्वल मानांकित किम वोन-हो आणि सिओ सेउंग-जे या जोडीचा पराभव करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT