

Lakshya Sen wins Australian Open 2025: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने हंगामातील पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या युशी तनाकाला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० स्पर्धा जिंकली. लक्ष्यने आपला दमदार फॉर्म कायम ठेवत ३८ मिनिटांच्या सामन्यात २६ वर्षीय तनाकाला २१-१५, २१-११ असे हरवले.
लक्ष्य सेन २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये तो चौथ्या स्थानावर राहिला होता. २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेत्याने गेल्या वर्षी लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये त्याचे शेवटचे सुपर ३०० विजेतेपद जिंकले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या हाँगकाँग सुपर ५०० स्पर्धेत तो विजयाच्या जवळ पोहोचला होता; परंतु उपविजेता ठरला.
या वर्षी ऑर्लीन्स मास्टर्स सुपर ३०० विजेतेपद जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत २६ व्या स्थानावर असलेल्या तनाकाचा सामना करताना, लक्ष्यने उत्कृष्ट नियंत्रण आणि गतिमान खेळ दाखवला आणि एकही गेम न गमावता सामना जिंकला. या विजयासह लक्ष्य या हंगामात BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी, आयुष शेट्टीने यूएस ओपन सुपर ३०० स्पर्धा जिंकली होती. इतर भारतीय खेळाडू, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, हाँगकाँग आणि चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. किदाम्बी श्रीकांतनेही या वर्षाच्या सुरुवातीला मलेशिया मास्टर्समध्ये उपविजेतेपद पटकावले होते.