स्पोर्ट्स

Sarfaraz Khan : सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराज खानला संधी; श्रीलंका कसोटी मालिकेत पुनरागमनाची शक्यता

खबरदारीचा उपाय म्हणून गिल सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर उतरला नाही

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येने त्रस्त आहे. युवा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत सरफराज खानचा भारतीय संघात समावेश केला जाण्याची प्रबळ शक्यता आहे. सरफराज गेल्या काही काळापासून राष्ट्रीय संघाबाहेर होता, मात्र आता त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी मिळताना दिसत आहे.

वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार, साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेत त्याच्या जागी सरफराज खानची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, याबाबतचा अंतिम निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अधिकृतपणे जाहीर करेल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

साई सुदर्शनच्या फिटनेसने वाढवली भारतीय संघाची चिंता

साई सुदर्शन सध्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये वैद्यकीय पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) प्रक्रियेतून जात आहे. त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावात भाग घेतला असला, तरी पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवला जाणार आहे. सुदर्शन भारतीय संघासोबत श्रीलंकेला गेलेला नाही. तसेच कोलंबो येथे श्रीलंका क्रिकेट ११ विरुद्ध ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही त्याने सहभाग घेतला नाही.

भारतीय संघाच्या अडचणी केवळ सुदर्शनपुरत्या मर्यादित नाहीत. कर्णधार शुभमन गिल याच्या उजव्या हाताच्या अनामिका (रिंग फिंगर) बोटाला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली असून तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गिल सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर उतरला नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. गिलच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. गिलची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत तंदुरुस्त होऊ शकेल का, यावर सध्या वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

बुमराहसह अनेक प्रमुख खेळाडू मालिकेबाहेर

भारतीय संघाला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत डाव्या पायाच्या गुडघ्याला झालेली दुखापत पूर्णपणे बरी न झाल्यामुळे बुमराहला श्रीलंका मालिकेतून वगळण्यात आले आहे. पुरुष निवड समितीने त्याच्या जागी आकिब नबीचा संघात समावेश केला आहे. याशिवाय हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हे खेळाडूदेखील दुखापतींमुळे संघाचा भाग नाहीयेत. वॉशिंग्टन सुंदर मांडीच्या स्नायूंच्या (हॅमस्ट्रिंग) दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे, तर आकाश दीप पाठीच्या त्रासातून सावरत असून तो निवडीसाठी उपलब्ध नाही.

WTC मध्ये पुनरागमनावर भारताची नजर

श्रीलंकेविरुद्धची ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) २०२५-२७ च्या चक्राचा एक भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताने ९ सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांत पराभव पत्करला आहे. भारताचे गुण टक्केवारी ४८.१५० इतकी आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापतींमुळे हैराण झालेल्या भारतीय संघासमोर अंतिम अकरा खेळाडूंचा योग्य समतोल साधण्याचे मोठे आव्हान असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT