

कोलंबो; वृत्तसंस्था : श्रीलंका क्रिकेट एकादशविरुद्धच्या ३ दिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने जोरदार पुनरागमन केले आहे. दुखापतग्रस्त बी. साई सुदर्शनच्या जागी मिळालेल्या संधीचे सोने करत देवदत्त पडिक्कलने १४२ धावांची नाबाद खेळी केल्यानंतर या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेरीस ९ बाद ३५७ धावांपर्यंत मजल मारली. या लढतीत भारत आता केवळ ६ धावांनी मागे आहे.
लंका एकादशने आपला पहिला डाव ८ बाद ३६३ धावांवर घोषित केल्यानंतर भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या के. एल. राहुलने (४० धावा) पडिक्कलसोबत ९६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मात्र, मधल्या फळीत ऋषभ पंत (२), ध्रुव जुरेल (१) स्वस्तात बाद झाल्याने भारताला मोठे झटके बसले.
पडिक्कलने सुरेख फलंदाजी करत १२१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. शतक झाल्यावर इतर खेळाडूंना सराव मिळावा म्हणून तो ‘रिटायर आऊट’ झाला होता. मात्र, खालच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यावर तो पुन्हा खेळायला आला आणि १६४ चेंडूंत १४२ धावांवर नाबाद राहिला. त्याला अखेरच्या सत्रात रवींद्र जडेजा (६३ धावा) आणि १८ चेंडूंत ३६ धावा ठोकणाऱ्या गुरनूर ब्रारची उत्तम साथ लाभली. आगामी कसोटी मालिकेसाठी संघात तिसर्या क्रमांकावर पडिक्कलने आपला दावा अतिशय भक्कम केला आहे.