IPL 2026, Sanju Samson CSK Captaincy
चेन्नई : यंदाच्या IPL हंगामापूर्वी T20 विश्वचषकात 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा बहुमान मिळालेल्या संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्सची (CSK)मध्ये महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात होते. त्याने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात केलेल्या धमाकेदार खेळीने भारतीय क्रिकेट संघाचा विजय सुकर झाला. आता हाच फॉर्म कायम ठेवत त्याने आयपीएलमध्येही लक्षवेधी कामगिरी केली आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सची (CSK) प्लेऑफमधील स्थानासाठीची दावेदारी भक्कम झाली आहे. चेपॉक (CSK) संघात दाखल झाल्यापासून, सॅमसन ऋतुराज गायकवाडकडून संघाच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेईल की नाही, याबद्दल सतत चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. मात्र, या ३१ वर्षीय खेळाडूने अखेर आपले मौन सोडले असून, या हंगामात आपण संघाचे नेतृत्व का करत नाही आहोत, याचे कारण त्याने स्पष्ट केले आहे.
चेन्नई संघात आगमन झाल्यापासून संजू सॅमसन ऋतुराज गायकवाडच्या जागी नेतृत्व स्वीकारणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. अवघ्या १३ धावांनी त्याचे या मोसमातील तिसरे शतक हुकले. मात्र, आता ३१ वर्षीय संजूने यावर मौन सोडले असून या मोसमात तो कर्णधार का नाही, याचे कारण स्पष्ट केले आहे. 'सुपर किंग्स' पॉडकास्टमध्ये बोलताना संजू म्हणाला की, नवीन संघात सामील झाल्यावर कर्णधारपदाचा विचार कधीच माझ्या मनाला आला नाही.
संजू म्हणाला, चेन्नई संघाचा कर्णधार होण्याचा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. माझ्याकडे आधीच एक संघ होता आणि तिथे माझे एक स्थान होते. मला तिथून बाहेर पडून दुसऱ्या संघात सामील व्हायचे होते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही एका संघातून दुसऱ्या संघात जाता, तेव्हा तुम्ही अटी किंवा मागण्या घालू शकत नाही. तुम्ही एका नवीन घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असता. जेव्हा तुम्ही नवीन घरात जाता, तेव्हा तिथे मागण्या घेऊन जायचे नसते, हेच मी शिकलो आहे, असेही त्याने स्पष्ट केले.
मूळचा केरळचा असलेल्या संजूने सांगितले की, त्याच्या मल्याळी मूल्यांनी कोणत्याही अपेक्षेविना संघासाठी सर्वोत्तम देण्याची शिकवण दिली आहे. तुम्ही तिथे जाता, स्वतःला सिद्ध करता आणि आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करता. चेन्नई आणि दुबईमध्ये अनेक मल्याळी लोक काम करतात. लोक मल्याळी माणसाला कामावर ठेवतात कारण तो विश्वासाची परतफेड करण्यासाठी आपला जीव ओततो. सीएसकेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला आमंत्रित केले, आता मी या संघासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे," असे त्याने पुढे नमूद केले.
संजूने यावेळी सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला पूर्ण पाठिंबा दिला. ऋतुराजच्या शांत स्वभावाचे आणि नेतृत्वाचे कौतुक करताना त्याने एक गुपितही उघड केले. राजस्थानमधून चेन्नईत येण्यासाठी खुद्द ऋतुराजनेच पुढाकार घेतला होता. तो भारतीय क्रिकेटमधील एक वेगळ्या प्रकारचा सुपरस्टार आहे. तो देशातील सर्वात मोठ्या फ्रँचायझीचे नेतृत्व करत असूनही त्याचे वागणे एखाद्या सामान्य सुपरस्टारसारखे नसते. तो कदाचित खूप आत्मविश्वासू वाटत नसेल, पण भारतीय क्रिकेट वर्तुळातील तो सर्वात खात्रीशीर आणि आत्मविश्वास असलेला खेळाडू आहे.
ऋतुराज गायकवाडने चेन्नई संघाचे एक वर्ष नेतृत्व केले आहे, तर मी पाच वर्षे दुसऱ्या संघाचे नेतृत्व केले आहे. तरीही त्याने स्वतःहून मला त्याच्या संघात खेळण्यासाठी आमंत्रित केले. अशा प्रकारचे पाऊल उचलण्यासाठी स्वतःवर प्रचंड विश्वास असावा लागतो. आजकाल लोक बोलतात खूप, पण बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची असते आणि ऋतुराजची हीच गोष्ट मला भावली, असेही संजू सॅमसनने स्पष्ट केले.