स्पोर्ट्स

CSK Captaincy | संजू सॅमसन भूषवेल CSKचे कर्णधारपद : आर. अश्विनने वर्तवले भाकीत

CSK Captaincy | संजू सॅमसन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी

पुढारी वृत्तसेवा

Sanju Samson Future CSK Captain? Ashwin Makes Big Prediction

चेन्नई : महेंद्रसिंह धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) कर्णधारपदाचा प्रयोग आतापर्यंत फारसा यशस्वी ठरलेला नाही. भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या मते, संजू सॅमसन भविष्यात कधीतरी पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करू शकतो.

धोनीनंतर चेन्नईला उत्कृष्ट नेतृत्वाची प्रतीक्षाच

महेंद्रसिंह धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदासाठी प्रथम रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली, मात्र आयपीएल २०२२ च्या मध्यातच धोनीला पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागली. त्यानंतर आयपीएल २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व सोपवण्यात आले, परंतु संघाची कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. २०२४ मध्ये चेन्नईचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता, तर २०२५ मध्ये १० संघांच्या गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानी फेकला गेला होता. यंदाच्या आयपीएल २०२६ हंगामातही चेन्नईने पाचपैकी तीन सामने गमावले असून संघ गुणतालिकेत खालच्या तीन क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर, आयपीएल २०२६ पूर्वी संघात सामील झालेल्या संजू सॅमसनकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

संजू सॅमसनमध्ये आहे नेतृत्वक्षमता

रविचंद्रन अश्विनच्या मते, संजू सॅमसन भविष्यात कधीतरी पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करू शकतो. अश्विनने 'ईएसपीएन क्रिकइन्फो'शी बोलताना सांगितले की, "सीएसकेमध्ये नेतृत्वाचे हस्तांतरण कधीच सुरू झाले आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा जडेजाकडे कर्णधारपद दिले होते, तेव्हाच ही प्रक्रिया सुरू झाली होती. जरी ते यशस्वी ठरले नसले तरी, त्यानंतर ऋतुराजकडे जबाबदारी आली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऋतुराज आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग मिळून संघ चालवत आहेत."

मी ज्योतिषी नाही...

अश्विन म्हणाला, "मी कोणताही ज्योतिषी नाही, त्यामुळे वेळ सांगू शकणार नाही. पण मला खात्री आहे की, संजू सॅमसन कधीतरी सीएसकेचे कर्णधारपद भूषवेल."

स्वतःची ओळख निर्माण कर

यावेळी अश्विनने संजूला मोलाचा सल्लाही दिला. तो म्हणाला, "संजूने कुणाच्याही पावलावर पाऊल ठेवून चालण्याची किंवा कुणाचा वारसा पुढे नेण्याचे दडपण घेण्याची गरज नाही. त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी असे मला वाटते. आपण जेव्हा दुसऱ्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच समस्या सुरू होतात. मला संजूला त्याच्या स्वतःच्या शैलीत नेतृत्व करताना पाहायला आवडेल."

यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये संजूची दमदार कामगिरी

आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी ट्रेडद्वारे चेन्नईत सामील झालेल्या संजू सॅमसनने सुरुवातीच्या अपयशानंतर जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या चौथ्या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले, तर त्यानंतरच्या सामन्यातही ३२ चेंडूत ४८ धावांची खेळी करत आपला फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळेच अश्विनच्या या भविष्यवाणीनंतर सोशल मीडियावर संजूच्या कर्णधारपदाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT