Sachin Tendulkar Captaincy Revelation Pudhari
स्पोर्ट्स

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाच्या काळात नेमकं काय घडत होतं? BCCIबद्दल केला खळबळजनक दावा

Sachin Tendulkar Captaincy Revelation: भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने खुलासा केला की, कर्णधार असताना त्याला भारतीय संघ निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नव्हते.

Rahul Shelke

Sachin Tendulkar Captaincy Revelation: भारताचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या फलंदाजीच्या विक्रमांमुळे नव्हे, तर भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत केलेल्या एका मोठ्या खुलाशामुळे तो चर्चेत आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मात्र, कर्णधार असतानाही मला संघ निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नव्हते, असे सचिनने सांगितले आहे.

सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याने स्वतःच्या कर्णधारपदाच्या अनुभवाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. तसेच भारताचे आपले आवडते कर्णधार कोण, हेही सांगितले. त्याच्या यादीत सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी या दोन दिग्गजांचा समावेश आहे.

कर्णधार असतानाही संघ निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते!

सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघाचे तिन्ही प्रकारांत प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने काही काळ भारतीय संघाचे कर्णधारपदही सांभाळले. मात्र, फलंदाज म्हणून त्याने मिळवलेले यश कर्णधार म्हणून मिळवता आले नाही.

आपल्या कर्णधारपदाच्या काळातील अनुभव सांगताना सचिन म्हणाला की, भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मात्र, कर्णधार असताना मला संपूर्ण संघ स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य कधीच मिळाले नाही.

त्याने पुढे सांगितले की, १९९० च्या दशकाच्या तुलनेत आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अधिक व्यावसायिक झाले आहे. त्या काळात भारतीय क्रिकेट अनेक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे त्यावेळची परिस्थिती आजच्या काळापेक्षा वेगळी होती. सचिनच्या या विधानामुळे त्याच्या कर्णधारपदाच्या काळातील निर्णयप्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सौरव गांगुली आणि धोनी हे सचिनचे आवडते कर्णधार

चाहत्यांनी सचिनला त्याच्या आवडत्या भारतीय कर्णधारांबद्दलही प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्याने सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांचे नावं घेतले. सचिन म्हणाला, "माझे आवडते कर्णधार सौरव गांगुली आणि एमएस धोनी आहेत. माझ्या यादीत हे दोघेही सर्वोच्च स्थानावर आहेत."

सौरव गांगुलीने भारतीय संघाला आक्रमक वृत्ती दिली. परदेशात जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. युवा खेळाडूंना संधी देत भारतीय संघाची नवी पिढी घडवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशी महत्त्वाची विजेतेपदे मिळवली. त्यामुळे या दोन्ही कर्णधारांविषयी सचिनच्या मनात विशेष आदर असल्याचे त्याच्या उत्तरातून स्पष्ट होते.

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाचेही सचिनकडून कौतुक

या संवादादरम्यान सचिनने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याचेही भरभरून कौतुक केले. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या नेतृत्वशैलीने सचिन प्रभावित झाला आहे.

बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

बावुमाच्या नेतृत्वाबद्दल बोलताना सचिन म्हणाला, "टेम्बा बावुमाच्या जिद्दीचे आणि उत्साहाचे मी मनापासून कौतुक करतो. तो स्वतः पुढाकार घेऊन संघाचे नेतृत्व करतो.''

सचिनच्या विधानामुळे जुन्या आठवणींना उजाळा

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके आणि २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मात्र, कर्णधार म्हणून तो यशस्वी झाली नाही.

आता अनेक वर्षांनंतर त्याने संघ निवडीच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानामुळे त्याच्या कर्णधारपदाच्या काळातील परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचवेळी गांगुली आणि धोनी यांच्याबद्दल व्यक्त केलेला आदर आणि बावुमाच्या नेतृत्वाचे केलेले कौतुक यामुळे सचिनच्या या वक्तव्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT