Ruturaj Gaikwad Century: भारतीय क्रिकेट संघाबाहेर असला तरी ऋतुराज गायकवाडने आपल्या बॅटची धार कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. श्रीलंका 'ए' विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. इंडिया 'ए' संघाकडून खेळताना गायकवाडने संयमी आणि जबाबदार फलंदाजी करत 112 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
विशेष म्हणजे, शतकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने केवळ 9 चौकार लगावले. त्यामुळे ही खेळी केवळ आक्रमक नव्हे तर परिपक्व आणि परिस्थितीनुसार खेळलेली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताला भक्कम धावसंख्या उभारता आली. यावेळी तिलक वर्मासोबत त्याने शतकी भागीदारीही रचली.
या शतकासह ऋतुराज गायकवाडच्या लिस्ट-ए कारकिर्दीतील शतकांची संख्या 21 वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वाधिक लिस्ट-ए शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांची बरोबरी केली आहे.
भारतीय क्रिकेटमधील या दोन दिग्गजांनीही आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत 21-21 शतके झळकावली होती. आता गायकवाडही या प्रतिष्ठित यादीत सामील झाला आहे. त्याने शतक पूर्ण करताच डगआउटमधील सहकारी खेळाडूंनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले.
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 21 शतके करणारे भारतीय फलंदाज:
राहुल द्रविड – 21 शतके
गौतम गंभीर – 21 शतके
ऋतुराज गायकवाड – 21 शतके
भारत 'ए', श्रीलंका 'ए' आणि अफगाणिस्तान 'ए' यांच्यात सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेतील हा पहिलाच सामना होता. या सामन्यात युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला केवळ 14 धावांवर समाधान मानावे लागले.
दुसऱ्या बाजूला तिलक वर्माने 60 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला स्थिरता दिली. तर प्रियांश आर्यनेही 32 धावांचे योगदान देत मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली.
ऋतुराज गायकवाडने मोठा विक्रम केला असला तरी भारतासाठी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांपासून तो अद्याप बऱ्याच अंतरावर आहे.
लिस्ट-ए क्रिकेट म्हणजे एका दिवसात पूर्ण होणारे आणि किमान 40 षटकांचे सामने. यामध्ये वनडे क्रिकेटचाही समावेश होतो.
या प्रकारात सर्वाधिक शतकांचा विक्रम भारतीय क्रिकेटचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 60 शतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्यांच्या नावावर 59 शतके आहेत. रोहित शर्मा 37 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, तर सौरव गांगुली 31 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
भारतासाठी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके:
सचिन तेंडुलकर – 60
विराट कोहली – 59
रोहित शर्मा – 37
सौरव गांगुली – 31
सध्या भारतीय संघातील पुनरागमनासाठी प्रयत्न करत असलेल्या ऋतुराज गायकवाडसाठी हे शतक खूप महत्त्वाचे मानले जात आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने निवडकर्त्यांचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले असून आगामी काळात त्याच्या संधी वाढू शकतात.