स्पोर्ट्स

Ravindra Jadeja Record : सर जडेजाची तलवार घुमली.. नोंदवला ऐतिहासिक पराक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत जडेजा 137 चेंडूंत 89 धावा करून तंबूत परतला. त्याच्या या खेळीत चिकाटी, अचूक टायमिंग आणि 10 चौकारांचा समावेश होता.

रणजित गायकवाड

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने शतकी खेळी केली, तर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. जडेजाने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करून एकेकाळी संकटात सापडलेल्या भारतीय संघाला कर्णधार गिलच्या साथीने मजबूत स्थितीत पोहचवले. मात्र, यादरम्यान, जडेजाचे शतक अवघ्या 11 धावांची हुकले. असे असले तरी, त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी कोणत्याही खेळाडूला जमलेली नाही, अशी कामगिरी करून दाखवली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जडेजाच्या 2000 धावा पूर्ण

सध्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे चौथे पर्व सुरू झाले आहे. भारतीय संघाची या पर्वातील ही पहिलीच मालिका आहे. जडेजाने या स्पर्धेत 2000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील 41 कसोटी सामन्यांमध्ये 2010 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि तेरा अर्धशतके झळकावली आहेत.

डब्ल्यूटीसीमध्ये जडेजाचे 100 बळी

इतकेच नव्हे, तर 2000 धावा करण्यासोबतच जड्डूने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 100 बळीदेखील घेतले आहेत. आता तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात 2000 धावा आणि 100 बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात जडेजाची गोलंदाजी अजून बाकी असली तरी, त्यापूर्वी फलंदाजी करताना त्याने 137 चेंडूंत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि एक षटकार लगावला.

भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे आवश्यक

भारतीय संघ मालिकेतील पहिला सामना गमावल्याने, हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. जर संघाने हा सामनाही गमावला, तर मालिकेत पुनरागमन करणे जवळपास अशक्य होईल. सामन्याला केवळ दोन दिवस झाले असले तरी, पहिल्या डावात 400 हून अधिक धावा करून भारतीय संघाने सध्या सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे. आता इंग्लंडचा संघ कशी फलंदाजी करतो, यावर पुढील सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT