Ravindra Jadeja rishabh pant test record:
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताला मोठमोठे दोन धक्के बसले. आधी कर्णधार शुभमन गिल हा रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सेट झालेला केएल राहुल ३९ धावा करून बाद झाला. यानंतर टीम इंडियाची सर्व मदार ही दोन डावखुरे फलंदाज ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजावर होती. या दोघांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रविंद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा माईल स्टोन पार केला. त्यानं कसोटी क्रिकेटमधील आपल्या ४००० धावा पार केल्या. याचबरोबर तो कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि ३०० विकेट्स घेणारा जगातील चौथाच खेळाडू ठरला आहे. या यादीत कपिल देव हे एकमेव भारतीय अष्टपैलू खेळाडू होते. आता या यादीत रविंद्र जडेजाचा देखील समावेश झाला आहे.
रविंद्र जडेजानं भारताकडून आतापर्यंत ८७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यानं ४००० धावा आणि ३३० विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि ३०० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लडच्या इयान बोधम यांचा नंबर लागतो. त्यांनी १०२ कसोटीत ५२०० धावा करत ३८३ विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी आहे. त्यानं ११३ कसोटीत ४५३१ धावा करत ३६२ विकेट्स घेतल्या आहेत. तर अव्वल स्थानावर असलेल्या दिग्गज कपिल देव यांनी १३१ कसोटीत ५२४८ धावा ठोकल्या असून ४३४ विकेट्स घेतल्या आहेत.
ऋषभ पंतनं दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत कमबॅक करत २४ चेंडूत २७ धावांची आक्रमक खेळी केली. त्याला मोठी खेळी करता आली नसली तरी त्यानं षटकारांच्या बाबतीत विरेंद्र सेहवागला देखील मागं टाकलं. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पंतनं मोडला. यापूर्वी ९० षटकार (१७८ डाव) मारणारा विरेंद्र सेहवाग हा अव्वल स्थानी होती. पंतनं दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात दोन षटकार ठोकत हा विक्रम मोडला. आता ९२ षटकारांसह (८३ डावात) पंत भारताकडून कसोटी सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे.