स्पोर्ट्स

Ravichandran Ashwin star culture | "हा काय हेरगिरीचा प्रकार..." : क्रिकेटमधील 'स्टार कल्चर'वर अश्‍विन नेमकं काय म्‍हणाला?

Ravichandran Ashwin star culture | भारतीय क्रिकेटमध्‍ये आपण 'सुपरहिरो कल्चर' किंवा 'सिनेमॅटिक कल्चर' तयार केले आहे...

पुढारी वृत्तसेवा

Ravichandran Ashwin star culture

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारतीय क्रिकेटमधील वाढत्या 'स्टार कल्चर'वर आणि सोशल मीडियावरील नॅरेटिव्ह सेट करण्याच्या पद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी काही खेळाडू जाणीवपूर्वक ठराविक बातम्या किंवा मते पसरवण्यात गुंतले आहेत का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला असून, या वाढत्या प्रकाराला त्याने 'आजार' असे संबोधले आहे.

सध्या एक प्रकारचा आजार पसरत आहे...

एका कार्यक्रमात बोलताना अश्विनने सोशल मीडियावरील 'फॅन आर्मी'च्या प्रभावावर आश्चर्य व्यक्त केले. हा एक व्यवसायाचा भाग असू शकतो, असा संशयही त्याने व्यक्त केला. अश्विन म्हणाला, "सध्या एक प्रकारचा आजार पसरत आहे. फॅन आर्मीच्या माध्यमातून सोशल मीडियावर जी मते मांडली जातात, ती मी अनेकदा प्रत्यक्ष ऐकली आहेत."

हेरगिरी की व्यवसायाचा भाग?

आपला अनुभव सांगताना अश्विन म्हणाला, "कधीकधी मी नाश्त्याच्या किंवा जेवणाच्या टेबलावर मते ऐकतो, तीच मते नंतर सोशल मीडियावर दुसऱ्याच नावाने प्रसिद्ध होतात. हे नेमके कसे घडते, याचे आश्चर्य वाटते. मी असे म्हणत नाही की, हे सारं खेळाडू स्वतः सगळं करतात; पण हे भीतीदायक आहे. हा काही हेरगिरीचा प्रकार आहे का? मला खात्री नाही, पण यात निश्चितपणे काहीतरी व्यावसायिक गणित गुंतलेले आहे."

दुसऱ्या क्रिकेटपटूबद्दल वाईट बोलणे मला कधीच पटणार नाही

आज प्रत्येक खेळाडू एक उद्योजक आहे. आपली मते बाहेर रेटल्याने ब्रँड व्हॅल्यू वाढते किंवा पीआर सुधारतो, हे मला मान्य आहे; पण त्यासाठी दुसऱ्या क्रिकेटपटूबद्दल वाईट बोलणे मला कधीच पटणार नाही, असेही अश्विनने ठणकावले.

आता खेळाबद्दल कोण बोलतं?

भारतीय क्रिकेटमध्ये खेळापेक्षा खेळाडूंच्या प्रतिमेला जास्त महत्त्व दिले जात असल्याबद्दलही त्याने खंत व्यक्त केली. "याची सुरुवात कुठून झाली? आपण खेळाडूंच्या भोवती विशिष्ट गोष्‍टी पेरायला सुरुवात केली. आपण एक 'सुपरहिरो कल्चर' किंवा 'सिनेमॅटिक कल्चर' तयार केले आहे. आता खेळाबद्दल कोण बोलतं? खेळाच्या तांत्रिक बाबींवर कोणीच चर्चा करत नाही," अशी खंतही त्‍याने व्‍यक्‍त केली.

माझ्यासाठी नेहमीच 'काय' आणि 'का' हे महत्त्वाचे असते...

शुभमन गिलच्या फलंदाजीबाबत त्याने केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत तो म्हणाला, "काही काळापूर्वी मी शुभमन कोणत्या पद्धतीने बाद होत आहे, यावर सविस्तर ट्विट केले होते. माझ्यासाठी नेहमीच 'काय' आणि 'का' हे महत्त्वाचे असते, 'कोणाबद्दल' हे नाही. पण लोकांनी लगेच त्याची तुलना सुरू केली. फक्त शुभमनबद्दलच का? इतरांबद्दल का नाही? असा प्रश्न विचारला गेला. मला वाटते, लोकांना मी काय करतोय हे तरी समजते का?", असा सवालही अश्विनने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT