

Ravi Shastri on India loss | सुपर-८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Ravi Shastri on India loss
नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या पराभवावर भाष्य करताना म्हटले आहे की, हा धक्का गरजेचा होता. सुपर-८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ७६ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पराभवावर भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रींच्या यांनी सडेतोड मत व्यक्त केले आहे.
'आयसीसी रिव्ह्यू'मध्ये बोलताना शास्त्री म्हणाले, " मला खरंच आनंद आहे की हे आत्ताच घडलं, विशेषतः अशा संघाविरुद्ध ज्यांचे सेमीफायनल गाठणे निश्चित मानले जात आहे. टीम इंडियासाठी अशा प्रकारचा धक्का गरजेचा होता. यामुळे त्यांना आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करण्यास आणि योग्य 'कॉम्बिनेशन' निवडण्यास भाग पडेल. मला पूर्ण खात्री आहे की ते जोरदार पुनरागमन करतील. ते या अनुभवातून शिकतील. सर्वच गोष्टी गांभीर्याने घेतील.
अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी, या वादावर शास्त्री म्हणाले, "मला वाटतं त्यांनी अक्षर पटेलला संघात घ्यायला हवं. तुम्हाला अनुभवाची गरज असते. मी तर म्हणेन की शक्य असल्यास दोघांनाही खेळवा, जेणेकरून तुमच्याकडे एक अतिरिक्त पर्याय असेल. कारण एखाद्या दिवशी कोणत्या तरी गोलंदाजाचा दिवस खराब असू शकतो. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीची लय नव्हती. त्याचे नुकसान संघाला सोसावे लागले. त्यामुळे बॅकअप असणे आवश्यक आहे."
अक्षर आणि वॉशिंग्टन या दोघांना खेळवण्याचा पर्याय सुचवताना शास्त्रींनी स्पष्ट केले की, "यामुळे तुमची आठव्या क्रमांकापर्यंतची फलंदाजी मजबूत होईल. अक्षर पटेल खेळला तर तो ८ व्या क्रमांकावर येऊ शकतो. तुमच्याकडे ५ क्रमांकावर हार्दिक पांड्या, ६ वर शिवम दुबे, ७ वर वॉशिंग्टन सुंदर आणि ८ वर अक्षर पटेल असतील. गरज पडल्यास अक्षरला ५ व्या क्रमांकावरही पाठवता येईल." ८ व्या क्रमांकापर्यंत फलंदाज असूनही तुम्ही टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकत नसाल, तर कुठेतरी काहीतरी चुकतंय. जर तुम्ही अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय ठेवत नसाल, तर ती मोठी चूक आहे. याचा अर्थ रिंकू सिंगला संघाबाहेर बसावे लागेल, पण जर रिंकूला खेळवायचे असेल, तर त्याला एखाद्या विशेषज्ञ फलंदाजाच्या जागी खेळवले पाहिजे, असा सल्लाही रवी शास्त्री यांनी दिला.