स्पोर्ट्स

Ranji Trophy : यशस्वी जैस्वालच्या शतकाने मुंबईची लाज राखली, राजस्थानविरुद्धचा पराभव टळला, सामना अनिर्णित

Mumbai vs Rajasthan : रणजी करंडक स्पर्धेत जैस्वालच्या १००० धावा पूर्ण

रणजित गायकवाड

ranji trophy yashasvi jaisawal century for mumbai against rajasthan

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वाल जवळपास १० महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर मुंबईकडून रणजी करंडक सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. रणजी करंडकातील जैस्वालचे हे पाचवे शतक ठरले. या खेळीदरम्यान त्याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याने रणजी करंडकामध्ये १००० धावा पूर्ण केल्या.

जयपूर येथील सवाई मान सिंह स्टेडियमवर यशस्वी जैस्वालने मुंबईच्या दुसऱ्या डावात हे महत्त्वपूर्ण शतक झळकावले. राजस्थान संघाने आपल्या पहिल्या डावात ६ बाद ६१७ धावांचा विशाल स्कोर उभारून डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरादाखल मुंबईचा संघ पहिल्या डावात २५४ धावांवर गारद झाला होता.

जैस्वालचे शतक आणि दीपक हुडाचे द्विशतक

दुसऱ्या डावात मुंबईकडून सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने सामन्याच्या चौथ्या दिवशी १२० चेंडूंमध्ये ११ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याने ६७ धावा केल्या होत्या.

या सामन्यात राजस्थानसाठी दीपक हुडाने उत्कृष्ट फलंदाजी करत २४८ धावांची मोठी खेळी केली. तर कार्तिक शर्माने १३९ धावांचे योगदान दिले आणि सचिन यादवने ९२ धावा केल्या. यशस्वीने दुसऱ्या डावात शतक झळकावून मुंबईला डावाने होणाऱ्या पराभवापासून वाचविण्यात यश मिळवले आणि अखेरीस हा सामना अनिर्णित ठेवण्यात मुंबईला यश आले.

रणजी करंडक स्पर्धेत जैस्वालच्या १००० धावा पूर्ण

१५६ धावांच्या या महत्त्वपूर्ण खेळीदरम्यान, यशस्वीने रणजी करंडकामध्ये १००० धावांचा टप्पा देखील पार केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे १७ वे शतक आहे. त्याने कसोटी आणि रणजी करंडक या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी ५-५ शतके झळकावली आहेत. याव्यतिरिक्त, रेस्ट ऑफ इंडिया आणि वेस्ट झोनसाठी त्याने प्रत्येकी २-२ शतके आणि इंडिया 'ए' संघासाठी १ शतक केले आहे. रणजी करंडकामध्ये त्याने ११ सामन्यांतील २१ डावांमध्ये १००० हून अधिक धावा केल्या आहेत.

वनडे मालिकेत जैस्वालला खेळण्याची संधी मिळाली नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल भारतीय संघाचा भाग होता. तथापि, तो राखीव सलामीवीर असल्याने त्याला त्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यापूर्वी, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता, जिथे त्याने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता तो आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT