स्पोर्ट्स

Ranji Trophy Records : ९० षटकांत ३२ बळी आणि २ हॅटट्रिक! ५४० चेंडूंमध्ये पहिल्याच दिवशी ‘रणजी’ सामन्याचा लागला निकाल

आसाम विरुद्ध सर्विसेस् संघांच्या सामन्यात ऐतिहासिक विक्रमाची नोंद, ठरला सर्वात लहान ‘महासंग्राम’

रणजित गायकवाड

ठळक बातम्या

  • रणजी ट्रॉफीमध्ये आसाम आणि सर्व्हिसेस मॅच

  • सर्वात लहान सामना ठरला.

  • हा सामना फक्त ९० षटकांत संपला.

ranji trophy match assam vs services 90 overs 32 wickets 2 hattricks

आसाम आणि सर्विसेस् यांच्यातील रणजी सामन्याचा निकाल केवळ ९० षटकांमध्ये लागला. या ऐतिहासिक सामन्यात तब्बल ३२ बळी आणि दोन हॅटट्रिकची नोंद झाली. सर्विसेस् संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकला.

सर्वात कमी चेंडूंत संपलेला रणजी सामना

शनिवारी (दि. २५) तिनसुकिया येथे रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या दुसऱ्या फेरीतील हा सामना आसाम आणि सर्विसेस् यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केवळ ९० षटके, ३२ बळी आणि ३५९ धावांची नोंद झाली, ज्यात दोन हॅटट्रिकचाही समावेश होता. केवळ ५४० चेंडूंमध्ये हा सामना संपल्यामुळे, रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील 'सर्वात कमी चेंडूंमध्ये संपलेला सामना' म्हणून याची नोंद झाली आहे.

यापूर्वी, १९६१-६२ च्या हंगामात दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामना ५४७ चेंडूंमध्ये संपला होता, ज्यात २२१ धावा झाल्या होत्या.

वेळेनुसार सर्वात लहान रणजी सामना

तथापि, वेळेच्या दृष्टीने रणजी ट्रॉफीचा सर्वात लहान सामना ४ नोव्हेंबर १९३४ रोजी मद्रास आणि म्हैसूर यांच्यात खेळला गेला होता. तो सामना केवळ १००.५ षटकांमध्ये पहिल्याच दिवशी संपला होता.

पहिल्या दिवसाचा अभूतपूर्व थरार

तिनसुकिया मैदानावर झालेला हा २१ व्या शतकातील दुसरा रणजी ट्रॉफी सामना होता. सामन्याच्या पहिल्याच दिवशी २५ फलंदाज बाद झाले. आसामची फलंदाजी पूर्णपणे कोसळली आणि ते पहिल्या डावात केवळ १७.२ षटकांत १०३ धावांवर गारद झाले. प्रत्युत्तरात, सर्विसेस् संघही १०८ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आसामचा दुसरा डाव २९.३ षटकांमध्ये फक्त ७५ धावांवर आटोपला. सर्विसेस् संघाने १३.५ षटकांमध्ये हे लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून शानदार विजय मिळवला.

हॅटट्रिकचा डबल धमाका

पहिल्या दिवशी सर्विसेसच्या गोलंदाजांनी आसामचा कर्णधार रियान पराग याचा फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरवला. सर्विसेस् संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज अर्जुन शर्माने रियान पराग, सुमित घडीगांवकर आणि सिबसांकर रॉय यांना बाद करत हंगामातील पहिली हॅटट्रिक नोंदवली. त्यानंतर त्याचा साथीदार डावखुरा वेगवान गोलंदाज मोहित जांग्राने दुसरी हॅटट्रिक घेतली. जांग्राने प्रद्युन सैकिया (५२ धावा, ४२ चेंडू, २ चौकार, ६ षटकार), मुक्तार हुसेन आणि भार्गव लखर यांना लागोपाठ तीन चेंडूंवर बाद केले. अर्जुन शर्मानेही बळींचा पंच लगावत (५/४६) आपल्या गोलंदाजीची छाप सोडली.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एकाच डावात दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, १९६३ मध्ये सर्विसेस् संघाकडून जोगिंदर सिंग राव यांनी एकाच डावात दोनदा हॅटट्रिक घेतली होती. ते अशी कामगिरी करणारे एकमेव भारतीय आहेत.

आसामची फलंदाजी आणि प्रतिहल्ला

आसामचा पहिला डाव फक्त १७.३ षटकांमध्ये १०३ धावांवर आटोपला. यानंतर कर्णधार रियान परागने गोलंदाजीची सूत्रे हाती घेतली आणि पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. त्याने एकूण ५ बळी मिळवले आणि एका वेळी चार चेंडूंमध्ये तीन बळी घेऊन हॅटट्रिकच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याचा सहकारी राहुल सिंगलाही हॅटट्रिक घेण्याची संधी मिळाली. सर्विसेस संघाची फलंदाजीही लवकर कोसळली, पण त्यांना पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाली. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या डावाची समाप्ती ४७ षटकांमध्ये चहापानाच्या वेळेपर्यंत केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT