India Pakistan T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर कोणाला फायदा होणार? 3 संघ स्पर्धेबाहेर जाणार

India Pakistan T20 World Cup 2026: 15 फेब्रुवारीच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट असून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना रद्द झाला तर भारत आणि पाकिस्तान दोघेही सुपर-8 मध्ये पोहोचतील.

Rahul Shelke

India Pakistan Match Rain: 15 फेब्रुवारीला होणाऱ्या T20 World Cup 2026 मधील भारत–पाकिस्तान महामुकाबल्याआधी आता एक नवं संकट उभं राहिलं आहे, ते म्हणजे पावसाचं. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हाय-व्होल्टेज लढतीवर पावसाचं सावट आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात लो-प्रेशर सिस्टीम तयार होत असून, त्यामुळे कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे.

रविवारी सकाळी हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे, मात्र दुपारनंतर परिस्थिती बदलू शकते. हवामान अंदाजानुसार दुपारपासून संध्याकाळपर्यंत 50 ते 70 टक्के पावसाची शक्यता असून, सामना सुरू होण्याआधीही जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे टॉस उशिरा होणं, षटकं कमी होणं किंवा थेट सामना रद्द होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

सामना झाला नाही तर काय होणार?

जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांचे तीन सामन्यांतून पाच-पाच गुण होतील आणि ते थेट सुपर-8 फेरीत प्रवेश करतील.

सध्या भारत ग्रुप-ए मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, पाकिस्तान दुसऱ्या, तर अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे.

मात्र भारत-पाकिस्तान सामना झाला नाही, तर तीन संघ थेट स्पर्धेबाहेर जातील —

  • अमेरिका

  • नामीबिया

  • नेदरलँड्स

यूएसए आणि नेदरलँड्सकडे सध्या दोन-दोन गुण आहेत. उरलेला सामना जिंकला तरी ते फक्त चार गुणांपर्यंत पोहोचू शकतात. नामीबियाने दोन्ही सामने गमावले असून त्यांचे खाते अजून उघडलेले नाही.

सामना झाला तर समीकरण बदलेल

जर भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल लागला, तर जिंकणारा संघ थेट सुपर-8 मध्ये पोहोचेल. पराभूत संघाचे चार गुण होतील आणि मग पात्रतेची लढत शेवटच्या सामन्यांपर्यंत रंगेल.

महत्त्वाची बाब म्हणजे, या टी20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप आणि सुपर-8 सामन्यांसाठी कोणताही ‘रिझर्व्ह डे’ नाही. रिझर्व्ह डे फक्त उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आला आहे.

एकूणच, 15 फेब्रुवारीचा सामना केवळ भारत-पाकिस्तान प्रतिस्पर्ध्यापुरता मर्यादित न राहता, हवामानामुळे संपूर्ण ग्रुपचं गणित बदलू शकतं. आता क्रिकेट चाहत्यांच्या नजरा मैदानासोबतच आकाशाकडेही लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT