Rahul Dravid on India WTC Final Qualification
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या फायनल शर्यतीत सध्या थोडा ‘मागे पडला आहे’, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे. श्रीलंकेतील उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती न्यूझीलंड दौऱ्यावर करणे सोपे नसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
डब्ल्युटीसी फायनलमध्ये दोनदा धडक मारणारा भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारताला उर्वरित बहुतांश सामने जिंकावे लागतील. जानेवारी २०२७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानातील पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामने खेळणार आहे.
द्रविड यांनी 'जिओस्टार'शी बोलताना सांगितले की, "मला आशा आहे की भारत डब्ल्युटीसी फायनलमध्ये पोहोचेल. सध्याच्या स्थितीचा विचार करता भारताने अंतिम फेरीत धडक मारल्यास ती एक अतिशय शानदार कामगिरी ठरेल. संघ सध्या थोडा मागे आहे, पण भारतीय संघात पुनरागमन करण्याची प्रचंड क्षमता आहे. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी चांगली सुरुवात केली आहे, हे पहिले पाऊल नक्कीच सकारात्मक आहे."
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याबाबत बोलताना द्रविड म्हणाले, "न्यूझीलंडला त्यांच्याच मायभूमीत हरवणे नेहमीच कठीण आव्हान असते. भारताच्या अनेक युवा खेळाडूंना अशा परिस्थितीत खेळण्याचा अनुभव नाही. त्यातच विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंची उणीव नक्कीच भासेल. भारताने गेल्या वेळी जेव्हा न्यूझीलंडचा दौरा केला होता, तेव्हा हे दिग्गज संघात होते."
भारतात होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकाही सोपी नसेल, असा इशारा द्रविड यांनी दिला. "ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात जिंकण्यासाठी उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या पिढीने भारतात मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे ते पूर्ण ताकदीने उतरतील," असे ते म्हणाले.
१५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबत बोलताना द्रविड म्हणाले, "वैभवच्या बाबतीत सर्वांनी थोडा संयम दाखवला पाहिजे. तो अजून खूप लहान आहे. मी त्याला जितके पाहिले आहे, त्यावरून मला खात्री आहे की, जर त्याला प्रथम श्रेणी (लाल चेंडूच्या) क्रिकेटमध्ये काही हंगाम खेळण्याची संधी मिळाली, तर तो नक्कीच भारतीय कसोटी संघात स्थान मिळवेल."