पंजाब किंग्स कर्णधार श्रेयस अय्यर (Pudhari Photo)
स्पोर्ट्स

Shreyas Iyer | श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीचा सुपरहिट शो! IPL विजयांचे ठोकले अर्धशतक

IPL 2025 | अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने ताकद आणि रणनैतिक कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

पुढारी वृत्तसेवा
रणजीत गायकवाड

Shreyas Iyer Punjab Kings Performance IPL

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रेयस अय्यर, याने रविवारी (दि.१ ) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला. तो आयपीएलमध्ये 50 विजय नोंदवणारा केवळ पाचवा कर्णधार ठरला. हा ऐतिहासिक क्षण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर 2 सामन्यात साकारला गेला. यावेळी पंजाब किंग्स (PBKS)ने पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI)ला पाच गडी राखून पराभूत करून 2014 नंतर दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला. या सामन्यातील विजयाने अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने आपली ताकद आणि रणनैतिक कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले.

श्रेयस अय्यरचा आयपीएल प्रवास

श्रेयस अय्यरने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स)कडून खेळताना केली. त्याने आपल्या आकर्षक फलंदाजीने आणि नेतृत्वगुणांनी लवकरच सर्वांचे लक्ष वेधले. 2018 मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले आणि त्याने संघाला 2019 मध्ये प्ले-ऑफपर्यंत आणि 2020 मध्ये आयपीएल फायनलपर्यंत नेले. त्यानंतर, 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR)ने त्याला आपला कर्णधार बनवले. त्या हंगामात केकेआर सातव्या स्थानावर राहिले. या कामगिरीने अय्यरच्या नेतृत्वावर काहींनी टीकाही केली. पण फ्रँचायझीने अय्यरवर विश्वास दाखवला आणि 2024 मध्ये त्याला कर्णधारपदी कायम ठेवले. अविश्वास अय्यरने सार्थ ठरवत 2024 मध्ये   KKR ला तिसरे आयपीएल विजेतेपद जिंकून दिले. आता, 2025 मध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून, अय्यरने आपल्या नेतृत्वाच्या जादूची कांडी पुन्हा फिरवली आहे.

अय्यरने एकूण 85 सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत, ज्यापैकी 50 सामन्यांमध्ये (यात दोन सुपर ओव्हरद्वारे जिंकलेले) विजय साकारला आहे. तर 34 सामने हरले असून दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. त्याच्या विजयाची टक्केवारी 57 % पेक्षा जास्त आहे. DC साठी त्याने 41 सामन्यांत 23 विजय मिळवले, ज्यात 2020 मधील उपविजेतेपदाचा समावेश आहे. KKR मध्ये, अय्यरने 29 सामन्यांत 17 विजय मिळवून 2024 मध्ये संघाला त्यांचा तिसरा IPL किताब जिंकून दिला.

तर PBKS सह आपल्या पदार्पणाच्या हंगामात, त्याने आतापर्यंतच्या 15 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय नोंदवले आहेत. त्याने प्लीज स्टेजमध्ये पंजाब संघाला 60 टक्के विजय दरासह गुणतालिकेच्या शीर्षस्थानी नेले.

विशेष म्हणजे, अय्यर हा एकमेव कर्णधार आहे ज्याने तीन वेगवेगळ्या IPL संघांना अंतिम फेरीपर्यंत नेले आहे आणि सलग दोन हंगामांत (2024 मध्ये KKR आणि 2025 मध्ये PBKS) दोन वेगवेगळ्या संघांसह लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावणारा एकमेव कर्णधार ठरला आहे.

50 विजयांचा टप्पा गाठणारा अय्यर हा महेंद्रसिंग धोनी (136), रोहित शर्मा (87), गौतम गंभीर (71) आणि विराट कोहली (66) सोबतच्या खास यादीत सामील झाला आहे.

क्वालिफायर 2: पंजाब किंग्सचा विजय

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 180 धावा केल्या. पंजाब किंग्सने धावांचा पाठलाग करताना 19.2 षटकांत 5 गडी गमावून हा सामना जिंकला. या सामन्यात अय्यरच्या नेतृत्वाखालील रणनीती आणि खेळाडूंनी दाखवलेली एकजूट यामुळे पंजाब किंग्सने 2014 नंतर प्रथमच आयपीएल फायनलमध्ये स्थान मिळवले.

अय्यरने या सामन्यात केवळ रणनीतीच नाही, तर मैदानावरील आपल्या नेतृत्वानेही सर्वांना प्रभावित केले. त्याने गोलंदाजांचा योग्य वापर केला आणि फलंदाजांना स्वातंत्र्य देताना त्यांच्यावर विश्वास दाखवला. या विजयाने पंजाब किंग्सच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे, आणि आता ते फायनलमध्ये विजेतेपद जिंकण्याची प्रतीक्षा करत आहेत.

अय्यरच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची खासियत त्याच्या शांत आणि संयमी स्वभावात आहे. तो दबावाखालीही धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना स्वातंत्र्य मिळते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर, तो संघातील प्रत्येक खेळाडूच्या सामर्थ्याचा योग्य वापर करतो. त्याने वेगवेगळ्या संघांना (दिल्ली, KKR, आणि आता पंजाब) यश मिळवून दिले, जे त्याच्या लवचिकतेचे द्योतक आहे.

आयपीएलमधील पंजाब किंग्सचा प्रवास

पंजाब किंग्सचा आयपीएलमधील इतिहास संमिश्र राहिला आहे. 2014 मध्ये त्यांनी फायनल गाठली होती, पण त्यानंतर त्यांना यश मिळाले नाही. 2025 मध्ये, अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने नव्या जोमाने आणि आक्रमक रणनीतीने खेळ दाखवला. त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी युनिटने संतुलित कामगिरी केली, आणि क्वालिफायर 2 मधील विजयाने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

पुढे काय?

आता पंजाब किंग्स फायनलमध्ये विजेतेपदासाठी लढणार आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. त्याचबरोबर, अय्यरसाठी हा टप्पा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील एक महत्त्वाचा क्षण आहे, आणि त्याच्याकडून चाहते आणखी मोठ्या यशाची अपेक्षा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT