स्पोर्ट्स

Glenn Maxwell ruled out of IPL : जातो बाबा.. काय जमेना खेळायला! ग्लेन मॅक्सवेलची IPL मधून अचानक आघार

सीएसके विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघातून स्टार अष्टपैलू समजला जाणारा ग्लेन मॅक्सवेल संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

रणजित गायकवाड

Glenn Maxwell ruled out of IPL 2025

मुंबई : आयपीएल 2025 चा हंगाम सध्या अतिशय रोमांचक टप्प्यातून जात आहे. स्पर्धेतील 10 पैकी 9 संघ प्लेऑफमध्ये गाठण्याच्या शर्यतीत आहेत. यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्जच्या संघाही समावेश आहे. या संघाने आतापर्यंत 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्ज संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू समजला जाणारा ग्लेन मॅक्सवेल संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. गुरुवारी (1 मे) पंजाब किंग्जने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट करून याची माहिती दिली.

बोटाच्या फ्रॅक्चरमुळे मॅक्सवेलला संघाबाहेर

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा मागील सामना पावसामुळे रद्द होण्यापूर्वी मॅक्सवेलला दुखापत झाली होती. त्या सामन्यात तो सात धावा काढून बाद झाला होता. दरम्यान, फ्रँचायझीने मॅक्सवेलच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. पंजाब किंग्जने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, बोटाच्या फ्रॅक्चरमुळे मॅक्सवेल या हंगामातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ग्लेन मॅक्सवेलला 4.2 कोटी रुपयांना पंजाब किंग्ज संघाचा भाग बनवण्यात आले होते. दरम्यान तो बाहेर पडल्याने त्याच्या जागी तीन खेळाडूंमध्ये चुरस असल्याचे समजते आहे.

चरिथ असलंका

आयपीएलच्या मेगा लिलावात श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू चरिथ असलंका अनसोल्ड राहिला. पण अलिकडच्या स्पर्धांमध्ये तो उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसले. तो मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज असून ऑफ-स्पिन गोलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. ज्यामुळे तो ग्लेन मॅक्सवेलसाठी एक उत्तम पर्याय असेल.

ख्रिस ग्रीन

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ख्रिस ग्रीन हा एक अनुभवी टी-20 तज्ज्ञ खेळाडू आहे. ज्याला अनेक लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो उजव्या हाताचा ऑफस्पिनर आहे, जो मॅक्सवेलप्रमाणे फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. त्याची किफायतशीर गोलंदाजी आणि मधल्या षटकांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता त्याला एक मजबूत पर्याय बनवते. रिकी पॉन्टिंग हे पीबीकेएसचे मुख्य प्रशिक्षक आहेत हे लक्षात घेता. ग्रीन हा फ्रँचायझीसाठी पसंतीचा पर्याय असू शकतो.

गुलबदिन नायब

अफगाणिस्तानचा गुलबदीन नायब हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. जो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. तो अलिकडच्या स्पर्धांमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. तो मध्यमगती गोलंदाजी करतो तसेच आक्रमक फलंदाजी करतो. मधल्या फळीला स्थिर करण्याची आणि महत्त्वपूर्ण यश मिळवून देण्याची त्याची क्षमता त्याला पीबीकेएससाठी एक मजबूत पर्याय बनवते.

यंदाच्या हंगामात मॅक्सवेल फेल

आयपीएल 2025 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलने खूपच सुमार दर्जाचे प्रदर्शन केले आहे. त्याने 6 डावांमध्ये 8 च्या सरासरीने फक्त 48 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 97.95 राहिला. गोलंदाजीत, मॅक्सवेलने सहा डावात 27.5 च्या सरासरीने चार विकेट्स घेतल्या. मॅक्सवेलला त्याच्या खराब कामगिरीमुळे अनेक माजी खेळाडूंकडून टीकेचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जचा संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 10 सामन्यांतून 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये त्यांचा पुढील सामना 4 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रंगणार आहे.

मॅक्सवेलची आयपीएल कारकीर्द

मॅक्सवेलने 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 141 सामने खेळले असून 135 डावांमध्ये 23.88 च्या सरासरीने आणि 155.14 च्या स्ट्राईक रेटने 2,819 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 18 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 95 आहे. तर गोलंदाजीत त्याने 34.46 च्या सरासरीने 41 विकेट्स घेतल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT