स्पोर्ट्स

PSL 2026 security threat | "पीएसएल मधून तत्‍काळ माघार घ्या" : पाकमधील सशस्त्र गटाची डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथला धमकी

PSL 2026 security threat | पीएसएलमध्ये सहभागी होणाऱ्या विदेशी खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

PSL 2026 security threat

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२६ ची 'पाकिस्तान सुपर लीग' (PSL) केवळ दोन शहरांमध्ये आणि प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या स्पर्धेवर आता संकटाचे सावट पसरले आहे. पीसीबीचे प्रमुख मोहसीन नकवी यांनी रविवारी (दि. २२ मार्च) सरकारी आदेशाची पुष्टी करताना पश्चिम आशियातील संघर्ष आणि इंधनाच्या वाढत्या किमती हे या निर्णयाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. दरम्‍यान, या घडामोडींमागे इतरही गंभीर कारणे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएसएलमध्ये सहभागी होणाऱ्या विदेशी खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, तसे न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे वृत्त समोर आले आहे.

जमात-उल-अहरारची थेट धमकी

पाकिस्तानातील 'जमात-उल-अहरार' या सशस्त्र गटाने डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि डॅरिल मिशेल यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंना इशारा देणारे सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या गटाने आपल्या निवदेनात म्हटले आहे की, जर हे खेळाडू टी-२० लीगसाठी पाकिस्तानात आले, तर त्यांच्या सुरक्षेची हमी देता येणार नाही. या पत्रात वॉर्नर, स्मिथ आणि इतर परदेशी खेळाडूंना पीएसएलमधून "त्वरित माघार घेण्यास" सांगण्यात आले आहे.

क्रिकेटला विरोध नाही, पण...

आपली भूमिका स्पष्ट करताना 'जमात-उल-अहरार'ने म्हटले आहे की, त्यांचा क्रिकेट या खेळाला विरोध नाही, परंतु पाकिस्तानमधील सध्याची सुरक्षा परिस्थिती आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेली ही हाय-प्रोफाईल स्पर्धा आयोजित करण्यासाठी योग्य नाही. आम्ही संबंधित क्रिकेट बोर्डांना सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी त्यांच्या खेळाडूंना पाकिस्तानात पाठवू नये. त्यांना काही झाले तर ती आमची जबाबदारी नसेल. आम्ही आमचा इशारा आधीच दिला आहे," असे जमात-उल-अहरारच्या एका कमांडरने 'द संडे गार्डियन'शी बोलताना सांगितले.

आम्ही सामने होऊ देणार नाही

खेळाडूंनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास काय होईल, असे विचारले असता जमात-उल-अहरारच्या कमांडर म्‍हणाला, "आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्व काही करू, पण आम्ही सामने होऊ देणार नाही. ही स्पर्धा विस्कळीत व्हावी आणि खेळाडू मैदानात उतरू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करू."

दिग्गज खेळाडूंचे भवितव्य टांगणीला

यंदाच्या पीएसएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ॲडम झॅम्पा, इंग्लंडचा मोईन अली आणि न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे यांसारख्या बड्या खेळाडूंचा सहभाग आहे. पीसीबीने आधीच कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत.पीएसएल स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार असून, आता संपूर्ण जगाचे लक्ष पीसीबी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या उद्भवलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जातात, याकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT