

T20 World Cup 2026: आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलचे चित्र स्पष्ट झालं असून भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहचले आहेत. पाकिस्तानचे आव्हान सुपर ८ मध्येच संपुष्टात आलं आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे पाकिस्तानच्या संघाने वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून दणकून मार खाल्ला आहे. गेल्या काही काळापासून भारत - पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर चिडलेल्या पीसीबीनं संघातील खेलाडूंना चांगलेच फैलावर घेत त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार टी २० वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडूला जवळपास ५० लाख पाकिस्तानी रूपये म्हणजे भारतीय रूपयांमधील जवळपास १६ लाख रूपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम पाकिस्तानी खेळाडूंच्या पगारातून कापून घेतली जाणार आहे.
सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानी संघ सेमी फायनलमध्ये पोहचू शकलेली नाही. यामुळं खेळाडूंच्या खराब कामगिरीचा त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यापूर्वी देखील खराब कामगिरीनंतर कडक कारवाई केली होती. मात्र आता मोठी रक्कमच दंड म्हणून वसूल केली जाणार असल्यानं तो चर्चेचा विषय ठरली आहे.
पाकिस्तानने आपले सर्व सामने हे श्रीलंकेत खेळले. मात्र होम पीच सारखी स्थिती असताना देखील त्यांना त्याचा चांगला फायदा उचलता आला नाही. पाकिस्तानने सुरूवातीला नेदरलँड्टला ३ विकेट्सने हरवलं. मात्र हा सामना देखील क्लोज झाला होता. त्यानंतर त्यांनी अमेरिकेला ३२ धावांनी पराभूत केलं. मात्र भारताकडून त्यांना ६१ धावांनी पराभव सहन करावा लागला. पाकिस्तान कसा बसा सुपर ८ मध्ये पोहचला.
सुपर ८ मध्ये पाकिस्तानची कहानीच बदलून गेली. न्यूझीलंडविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला २ विकेट्सने हरवलं. श्रीलंकेविरूद्ध जरी पाकिस्तान जिंकला असला तरी खराब नेट रनरेटमुळं त्यांना सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. आता या खराब कामगिरीचा आर्थिक भूरदंड हा खेळाडूंवर पडणार आहे.
यंदाच्या टी २० वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं खूप नाटक केलं होतं. भारत - पाकिस्तान सामना होणार नाही नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार घातला होता. पीसीबी प्रमुख नक्वींचे हे नाटक खूप दिवस सुरू होतं. शेवटच्या क्षणी पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं नक्वींची नाचक्की झाली होती. आता या पराभवाचं खापर खेळाडूंवर फोडण्यात येत आहे.