Pakistan former player Latif on Rizwan :
कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे संघात मोठा बदल केला आहे. वनडेच्या कर्णधारपदावरून मोहम्मद रिझवान याला हटवण्यात आले असून, त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्याकडे संघाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच बाबर आझमची उचलबांगडी करून रिझवानला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र अवघ्या वर्षभरात त्याचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. आता यामागील कारण पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशीद लतीफ यांनी सांगितले आहे.
रिझवानला कर्णधारपदावरून हटवल्याने संपूर्ण पाकिस्तानी क्रिकेट जगतात खळबळ उडाली असताना, संघाचा माजी खेळाडू रशीद लतीफ याने या निर्णयासाठी प्रशिक्षक माईक हेसन यांना जबाबदार धरले आहे. रिझवानने गाझा-इस्रायल संघर्षावर फिलिस्तीनला सार्वजनिकरित्या पाठिंबा दिल्यामुळे हेसनने हा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये लतीफ म्हणाले, “रिझवान याने पॅलेस्टाईनचा झेंडा उचलला म्हणून त्याला कर्णधारपदावरून काढणार? एका इस्लामिक देशात गैर-इस्लामिक कर्णधार यावा, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. या निर्णयामागे माईक हेसन आहेत, बरोबर? ड्रेसिंग रूममधील ही संस्कृती त्यांना आवडत नाही. त्यांना हे का समजत नाहीये? त्यांच्यासोबत ५-६ लोकांची टीम आहे. त्यांना ड्रेसिंग रूममधील अशी संस्कृती संपवायची आहे.”
या व्हिडिओमध्ये लतीफ यांनी असाही दावा केला की रिझवानने कर्णधार म्हणून ड्रेसिंग रूममध्ये धार्मिक प्रथा आणल्या. या गोष्टी हेसन यांना आवडल्या नाहीत. या वर्षी एप्रिलमध्ये रिझवानने त्याची PSL फ्रँचायझी ‘मुलतान सुल्तान्स’मार्फत प्रत्येक षटकार आणि विकेटसाठी फिलिस्तीनी धर्मादाय संस्थांना १,००,००० पाकिस्तानी रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते. २०२३ मध्ये रिझवानने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यातील पाकिस्तानचा विजय “गाझातील आमच्या बंधू-भगिनींना” समर्पित केला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रिझवानला हटवण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही किंवा अधिकृत निवेदनात त्याच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. बोर्डानुसार, निवड समिती आणि पाकिस्तानचे वनडे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रिझवानला हटवणे जवळपास निश्चित होते, अशी चर्चा पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात आहे. रिझवानला बदलण्याचा हा निर्णय केवळ हेसन यांच्या प्रेरणेने घेतला गेला नसून, निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या PCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही व्यापक पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.