

Pakistan Cricket Board : कर्णधारपदावरुन पाकिस्तान क्रिकेटमधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तानच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपदी निवडण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याची घोषणा केली.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेतृत्त्वाचा तिढा कायमच राहिला आहे.
मोहम्मद रिझवान याला हटवून पुन्हा एकदा वनडे कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपविण्यात आली आहे.
२०२४ मध्ये रिझवानकडे वनडेसह टी-२०चे नेतृत्त्व सोपविण्यात आले होते.
इस्लामाबादमध्ये वन डे प्रशिक्षक माइक हेसन, हाय परफॉर्मन्स डायरेक्टर आकिब जावेद आणि राष्ट्रीय निवड समिती यांच्यात बैठक झाली. यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, शाहीन ४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून पाकिस्तान संघाची जबाबदारी स्वीकारेल. शाहीनने यापूर्वी २०२४ च्या सुरुवातीला टी२० संघाचे नेतृत्व केले होते; परंतु दोन महिन्यांनंतरच त्याच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आली होती.
रिझवानला ऑक्टोबर २०२४ मध्ये पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी२० संघांचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित निकाल मिळाले नाहीत. रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने २० पैकी नऊ एकदिवसीय सामने जिंकले, तर ११ सामने गमावले. रिझवानचा विजयाचा टक्का ४५ टक्के होता.
टी२० मध्ये त्याचे नेतृत्व आणखी अपयशी ठरले, रिझवान कर्णधार असताना पाकिस्तानने चारही सामने गमावले.टी२० मालिकेतील पराभवानंतर, रिझवानच्या जागी सलमान अली आगा यांना टी२० कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, परंतु तोपर्यंत तो एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत होता. पीसीबीने पुन्हा एकदा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानी संघात नियमित नेतृत्व बदल सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रिझवानला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याच्या बातम्या सतत येत होत्या, परंतु सोमवारच्या बैठकीनंतर त्याला हटवण्याची औपचारिक पुष्टी करण्यात आली.