पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या 'मोडक्या-तोडक्या' इंग्रजी संभाषणामुळे क्रिकेट विश्वात विनोदाचा विषय ठरलेला पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याची आता IPLमधील भारताचा स्टार फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) खिल्ली उडवली आहे. इशान किशन आणि माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांच्यातील एक मजेदार संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तान यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान हा मैदानावरील त्याच्या कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. बनावट क्रॅम्पिंगपासून ते विकेटमागे सतत अपील करत मैदानावरील पंचांना हैराण करणारा यष्टीरक्षक अशीही त्याची ख्याती आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माजी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी हे स्टंपच्या मागे उभे राहून अपील करण्याच्या परिपक्वतेसाठी किशनचे कौतुक करतात. तू माझ्या पंचांच्या नेतृत्वाखाली इतके सामने खेळलास. आता तू मोठा झाला आहेस. गरज पडल्यास अपीलही करतोस. पूर्वी तू खूप अपील करायचास. हा बदल कसा झाला?" असा सवाल चौधरी करतात. यावर इशान म्हणतो," अलिकडे यष्टीरक्षण करणे हे स्मार्ट काम झाले आहे. मला वाटतं पंच खूप हुशार झाले आहेत. दरवेळी अपील करत असतील, तर ते फलंदाज आऊट असला तरीही नॉट आऊट देतील. जर मी मोहम्मद रिझवानसारखे काही केले (मोहम्मद रिझवान टाइप कुछ करुंगा तो...) तर तुम्ही फलंदाजाला आऊट देऊ शकता किंवा नॉट आऊट देऊ शकता," अशी विचारणा करत इशानने रिझवानच्या अतिरेकी अपीलची खिल्ली उडवली.
पंचगिरीबाबत बोलताना किशन म्हणाले, "खरे सांगायचे तर, काही पंच आहेत ज्यांना सामन्यांमध्ये पंचगिरी करताना पाहून आम्हाला आनंद होतो. तथापि, सुधारणेला नेहमीच वाव असतो. मला वाटते की येणाऱ्या नवीन पंचांनी निर्णय घेताना अधिक आत्मविश्वासाने काम करावे. त्यांनी परिणामांचा अतिविचार करू नये, परंतु जर त्यांना वाटत असेल की एखादा फलंदाज बाद झाला आहे, तर त्यांनी अपील किंवा इतर घटकांमुळे प्रभावित न होता निर्णय घ्यावा."