PSL Ball Tampering Controversy
कराची : पाकिस्तान क्रिकेटला धक्का देणार्या पीएसएल (PSL) 'बॉल टेम्परिंग' वादात दोषी आढळल्यानंतर, पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानवर आज (दि. ३१) दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. रविवारी लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यातील सामन्यावेळी फखर जमान बॉल टेम्परिंग करताना आढळला होता.
'पीएसएल'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "रविवारी लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात सामना झाला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम २.१४ नुसार फखर जमान 'लेव्हल ३' चा गुन्हा करताना दोषी आढळला. त्यामुळे त्याला पुढील दोन एचबीएल पीएसएल सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे." मॅच रेफरी रोशन महानामा यांनी शिस्तभंग प्रकरणाची सुनावणी घेतली. सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावातील १९ व्या षटकाच्या शेवटी हा संपूर्ण वाद सुरू झाला. शेवटच्या षटकात कराचीला विजयासाठी १४ धावांची गरज होती. लाहोरकडून हॅरिस रौफ गोलंदाजी करणार होता. षटक सुरू होण्यापूर्वी फखर जमान हा हॅरिस रौफ आणि लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी यांच्याशी चर्चा करताना दिसला. त्यानंतर लगेचच पंच फैसल आफ्रिदी यांनी चेंडू तपासण्यासाठी मागवून घेतला.
पंच फैसल आफ्रिदी आणि स्क्वेअर-लेग पंच शरफुद्दौला यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. लाहोर कलंदर्सच्या खेळाडूंनी जाणीवपूर्वक चेंडूची स्थिती बदलल्याचा (बॉल टेम्परिंग) निष्कर्ष पंचांनी काढला. शिक्षा म्हणून कराची किंग्सला ५ पेनल्टी धावा बहाल करण्यात आल्या आणि चेंडू तातडीने बदलण्यात आला.
या ५ पेनल्टी धावांमुळे कराची किंग्सला शेवटच्या षटकात विजयासाठी केवळ ९ धावांची गरज उरली होती. अष्टपैलू अब्बास आफ्रिदीने हॅरिस रौफच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकत कराचीला विजय मिळवून दिला.