novak djokovic 100th win in wimbledon
टेनिस जगतातील दिग्गज आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन 2025 मध्ये आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठी कामगिरी नोंदवताना, विम्बल्डनच्या इतिहासात 100 विजय मिळवणारा केवळ तिसरा पुरुष खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.
विम्बल्डन 2025 मध्ये, 38 वर्षीय सर्बियन दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच उत्कृष्ट लयीत दिसत आहे. 5 जुलै रोजी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात, जोकोविचने आपलाच देशबांधव असलेल्या मिओमिर केकमानोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत हा ऐतिहासिक टप्पा गाठला. या विजयासह, तो विम्बल्डनमध्ये 100 सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रतिष्ठित यादीत सामील झाला आहे.
नोवाक जोकोविचने विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत मिओमिर केकमानोविचविरुद्धचा सामना 6-3, 6-0, 6-4 असा सहज जिंकून पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता त्याची लढत 11व्या मानांकित ॲलेक्स डी मिनॉरशी होईल. विम्बल्डनच्या इतिहासात जोकोविचपूर्वी केवळ दोन खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त एकेरी सामने जिंकले आहेत. नऊ वेळा विम्बल्डन विजेती ठरलेल्या मार्टिना नवरातिलोव्हा यांनी 120 सामने, तर आठ वेळा चॅम्पियन ठरलेल्या रॉजर फेडररने 105 एकेरी सामने जिंकले आहेत. आता या दिग्गजांच्या पंक्तीत जोकोविचचाही समावेश झाला आहे.
जोकोविचने आपल्या 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदांपैकी सात विजेतेपदे ऑल इंग्लंड क्लबमध्येच पटकावली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून विम्बल्डनमध्ये त्याचे निर्विवाद वर्चस्व राहिले असून, या काळात त्याला केवळ कार्लोस अल्कारेझकडून पराभव पत्करावा लागला आहे. ‘माझ्या सर्वात आवडत्या स्पर्धेत मी जे काही विक्रम प्रस्थापित करेन, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे,’ अशी भावना जोकोविचने या कामगिरीनंतर व्यक्त केली.
भारताच्या युकी भांबरीने आपला अमेरिकन जोडीदार रॉबर्ट गॅलोवेसह विम्बल्डन 2025 च्या पुरुष दुहेरी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (तिसऱ्या फेरीत) प्रवेश केला आहे. 16व्या मानांकित भांबरी-गॅलोवे जोडीने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पोर्तुगालच्या नुनो बोर्जेस आणि मार्कोस गिरोन जोडीचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला.