
झाग्रेब (क्रोएशिया) : भारतीय बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेशने पुन्हा एकदा जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत करत ग्रँड चेस टूर सुपर युनायटेड रॅपिड स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवारी झालेल्या सहाव्या फेरीत गुकेशने काळ्या मोहर्यांनी खेळताना कार्लसनचा पराभव केला आणि स्पर्धेत एकट्याने आघाडी घेतली.
गुकेशने स्पर्धेच्या दुसर्या दिवशी उज्बेकिस्तानच्या नोदिर्बेक अब्दुसत्तारोव आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनावर विजय मिळवला. त्यानंतर कार्लसनविरुद्धच्या सामन्यातही त्याने बाजी मारली. हे गुकेशचे सलग पाचवे विजय ठरले. विशेष म्हणजे, स्पर्धेपूर्वी कार्लसनने गुकेशला ‘कमकुवत खेळाडू’ असे संबोधले होते. मात्र, गुकेशने आपल्या खेळाने त्याला प्रत्युत्तर दिले. कार्लसनने इंग्लिश ओपनिंग निवडली होती, पण गुकेशने 26 व्या डी 5 या चालीनंतर सामन्यात वर्चस्व मिळवले.
49 व्या चालीला कार्लसनने शरणागती पत्करली. या विजयामुळे गुकेशने 12 पैकी 10 गुण मिळवत स्पर्धेत दोन गुणांची आघाडी घेतली आहे. मॅग्नसला हरवणे नेहमीच खास असते. दोन वेळा हरलेल्या स्थितीतून विजय मिळवणे आनंददायक आहे, असे गुकेशने सांगितले. आता उर्वरित ब्लिट्झ फेर्यांमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गुकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय बुद्धिबळ प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.