स्पोर्ट्स

Nicholas Pooran MI Team Captain : निकोलस पूरनचे टॅलेंट अंबानींनी हेरले! पोलार्डला हटवून MI संघाच्या कर्णधारपदी दिली बढती

निवृत्तीनंतर पूरनला एक अनपेक्षित आणि मोठी संधी मिळाली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा आता तो सांभाळणार आहे.

रणजित गायकवाड

Nicholas Pooran MI New York captain

टी-20 फॉरमॅटचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत संपूर्ण क्रिकेट क्रिकेटजगतात मोठी खळबळ उडवून दिली. अवघ्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा करण्याचा त्याचा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला. असे असले तरी तो जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, निवृत्तीच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी पूरनला एक अनपेक्षित आणि मोठी संधी मिळाली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या मेजर लीग क्रिकेट (MLC) मधील एमआय न्यूयॉर्क (MI New York) संघाच्या कर्णधारपदाची धुरा आता निकोलस पूरन सांभाळणार आहे. यापूर्वी संघाचे नेतृत्व करणाऱ्या अनुभवी कायरन पोलार्डच्या जागी पूरनची निवड करण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाकडून मिळालेली ही भेट पूरनच्या कारकिर्दीला नवी दिशा देणारी ठरू शकते, असे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच एका मोठ्या लीगमध्ये कॅप्टन्सीची संधी मिळणे, हे पूरनच्या क्षमतेवर आणि अनुभवावर असलेला विश्वास दर्शवते. या नव्या जबाबदारीसह पूरन मैदानावर कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमआय न्यूयॉर्कसाठी चमकदार कामगिरी

निकोलस पूरनने 2023 आणि 2024 मध्ये एमआय न्यूयॉर्कसाठी उत्कृष्ट खेळ केला. 2023 मध्ये त्याने 8 सामन्यांत 388 धावा फटकावल्या होत्या. त्या हंगामात तो टॉप स्कोरर होता. याच वर्षी एमआय न्यू यॉर्क संघ एमएलसी विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला.

2024 मध्ये पूरनने 7 सामन्यांत 180 धावा केल्या. या दरम्यान, त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली. त्या हंगामात, पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला. येत्या हंगामात, आता पूरन त्याच्या नेतृत्वाखाली संघासाठी विजेतेपद जिंकू इच्छितो. एमएलसी 2025 मध्ये एमआय न्यू यॉर्कचा पहिला सामना 13 जून रोजी टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध असेल. हा सामना ओकलंड कोलिझियम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पूरनला कर्णधार बनवल्यानंतर एमआय न्यू यॉर्क फ्रँचायझीने काय म्हटले?

फ्रँचायझीने एका प्रेस रिलीजद्वारे निकोलस पूरनला कर्णधार बनवण्याबाबत माहिती दिली. फ्रँचायझीने म्हटले की ‘आमचा हिरो, आमचा कर्णधार! निकोलस पूरन.. 29 वर्षीय पॉकेट डायनामाइट, एमआयएनवायचा सुपरस्टार. त्याला मेजर लीग क्रिकेटच्या 2025 च्या हंगामापूर्वी एमआय न्यू यॉर्कचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हा डावखुरा विकेटकीपर फलंदाज जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे. तो त्याच्या नेतृत्वाखाली संघाला नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.’

IPL मध्येही धमाकेदार प्रदर्शन

आयपीएल 2025 साठी लखनौ सुपर जाएंट्स फ्रँचायझीने पूरनला 21 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. फ्रँचायझीचा हा निर्णय त्याने सार्थ ठरवला. आयपीएल 2025 मध्ये त्याने आपल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर 14 डावांमध्ये 524 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 5 अर्धशतके नोंदवली. तथापि, त्याचा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर प्रश्न उपस्थित

पूरनने मगळवारी (10 जून) सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्याने चाहते आश्चर्यचकित झाले. इतक्या तरुण वयात क्रिकेटला अलविदा केल्याबद्दल चाहत्यांनी त्याला ट्रोल करत पूरनने पैशांसाठी राष्ट्रीय संघाला सोडचिठ्ठी दिल्याचा गंभीर आरोप केला.

निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

निकोलस पूरनने 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 2019 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला. त्याने 61 वनडे सामन्यांमध्ये 3 शतके आणि 11 अर्धशतकांसह 1983 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 106 सामन्यांमध्ये 13 अर्धशतकांसह 2275 धावा केल्या आहेत. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 19 नोव्हेंबर 2024 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT