National Sports Awards 2025  Pudhari
स्पोर्ट्स

National Sports Awards: राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा; 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, मात्र खेळरत्नसाठी एकही नाव नाही

National Sports Awards 2025: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर झाले असून, विविध खेळांतील 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

National Sports Awards 2025: केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर केले आहेत. यंदा देशातील 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी यंदा एकाही खेळाडूची निवड झालेली नाही.

निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

'या' खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार

यंदाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. यात तेजस्विन शंकर, धावपटू मुहम्मद अजमल व्ही आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, बुद्धिबळ खेळाडू विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांचा समावेश आहे.

तसेच हॉकीपटू लालरेमसियामी आणि राजकुमार पाल, नेमबाज अखिल श्योराण, पॅरा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अॅथलीट एकता भ्यान, रोइंगपटू अरविंद सिंह, बॉक्सर नरेंद्र, कबड्डीपटू सुरजीत आणि पूजा, तसेच नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

माजी फुटबॉलपटू अरुमैनायगम यांना जीवनगौरव

माजी भारतीय फुटबॉलपटू आय. अरुमैनायगम यांना अर्जुन पुरस्काराच्या जीवनगौरव श्रेणीत सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तीन वेळा ड्युरंड कपही जिंकला आहे.

खेलरत्न पुरस्कारासाठी एकही खेळाडू नाही

यंदा सर्वात मोठी बाब म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

गेल्या वर्षी मात्र चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह, पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार आणि ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर यांचा समावेश होता.

प्रशिक्षकांनाही मिळाला सन्मान

यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्काराच्या श्रेणीत अॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंह, बॉक्सिंग प्रशिक्षक छोटेलाल यादव आणि नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांची निवड झाली आहे. तर जीवनगौरव श्रेणीत बॉक्सिंग प्रशिक्षक धर्मेंद्र सिंह यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुण्यातील Army Paralympic Nodeचा सन्मान

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार यंदा पुण्यातील Army Paralympic Node यांना जाहीर करण्यात आला आहे.

एकूणच, 2025 च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये विविध खेळांतील 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र, देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या खेळरत्न पुरस्कारासाठी एकही नाव जाहीर न झाल्याने यंदाचा पुरस्कार सोहळा विशेष चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT