Ashmita Chaliha BWF Tour title : कोरियामध्‍ये अश्मिता अजिंक्‍य! पहिल्‍यावहिल्‍या ‘बीडब्ल्यूएफ’ जेतेपदावर शिक्‍कामोर्तब

Korea Masters 2026 : निर्णायक अंतिम लढतीत चीनच्या हान कियान शी हिचा धुव्वा
Ashmita Chaliha wins maiden BWF Tour title after comeback victory at Korea Masters 2026
Published on
Updated on

आसान (द. कोरिया) : भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहाने आपल्या बहारदार आणि आक्रमक खेळाच्या जोरावर कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अश्मिताने चीनच्या चौथी मानांकित खेळाडू हान कियान शीचा १४-२१, २१-१४, २१-१४ असा पराभव केला. अश्मिताच्या कारकिर्दीतील हे पहिलेच ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर’ जेतेपद आहे.

दुखापतीवर मात करत ऐतिहासिक पुनरागमन

आसामच्या २६ वर्षीय अश्मितासाठी हा विजय अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा आहे. दोन वर्षांपूर्वी याच दक्षिण कोरियामध्ये खेळताना तिच्या उजव्या गुडघ्याची नस दुखावल्‍याने तिच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, तिने या दुखापतीवर मात करत जेतेपद खेचून आणले.

पहिल्या गेममधील पराभवानंतर जोरदार मुसंडी

जागतिक क्रमवारीत ५० व्या स्थानी असलेल्या अश्मिताची सुरुवात संथ झाली. कोर्टवरील वाऱ्याच्या प्रवाहामुळे पहिल्या गेममध्ये तिला फटक्यांवर नियंत्रण राखता आले नाही. याचा फायदा घेत जागतिक क्रमवारीत ३५ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या हानने २१-१४ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये अश्मिताने प्रशिक्षक पार्क ते-सांग यांच्या सल्ल्यानुसार रणनीती बदलली. हा गेम अश्मिताने २१-१४ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मध्यंतरापर्यंत चीनची हान ११-९ अशी पुढे होती. मात्र, कोर्ट बदलल्यानंतर अश्मिताने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. तिने सलग गुण घेत आधी १२-११ अशी आघाडी घेतली आणि नंतर अप्रतिम क्रॉस-कोर्ट शॉट मारत १९-१४ अशी मजबूत स्थिती निर्माण केली. अखेर हानने परतीचा शॉट कोर्टबाहेर मारल्याने अश्मिताने २१-१४ ने गेमसह ५३ मिनिटांत सामना आणि जेतेपद आपल्या नावावर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news