National Sports Awards 2025 pudhari photo
स्पोर्ट्स

National Sports Awards 2025 : विदित गुजराती, दिव्या देशमुख यांना 'अर्जुन', नेहा चव्हाण यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांत महाराष्ट्राचा गौरव; पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय यश, नेमबाजीतील उत्कृष्ट प्रशिक्षण आणि दिव्यांग सैनिकांच्या क्रीडा पुनर्वसनातील उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये आपली ठळक छाप उमटवली आहे. महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना 'अर्जुन' पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड या संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे शुक्रवारी (दि. १३) आयोजित विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या समारंभास केंद्रीय युवा कार्य व क्रीडामंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते.

नाशिकचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती याने बुद्धिबळ क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुडापेस्ट येथे झालेल्या ४५ व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये सुवर्णपदक, हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, तसेच आयल ऑफ मॅन येथे झालेल्या फिडे ग्रँड स्विस २०२३ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी त्याने केली आहे. त्याच्या या आंतरराष्ट्रीय यशाची दखल घेत त्याला 'अर्जुन' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नागपूरची युवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या जितेंद्र देशमुख हिनेही आपल्या दरामुख उल्लेखनीय कामगिरीने महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. ४५ व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये दोन सुवर्णपदके, अलमाटी येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई खंडीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०२२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविण्याची कामगिरी तिने केली आहे. तिच्या या यशस्वी क्रीडा प्रवासाचा गौरव 'अर्जुन' पुरस्काराने करण्यात आला.

नेहा चव्हाण यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार

नेमबाजी क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षण कार्य आणि खेळाडूंच्या कौशल्यविकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्यासाठी मिळालेल्या प्रोत्साहनाची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली आहे.

देशभरातील क्रीडापटू आणि प्रशिक्षकांचाही गौरव

या सोहळ्यात अॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंह आणि बॉक्सिंग प्रशिक्षक छोटेलाल यादव यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार, तर कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार आणि बॉक्सिंग प्रशिक्षक धर्मेंद्र सिंह यादव यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार (जीवनगौरव) प्रदान करण्यात आला.

'अर्जुन' पुरस्काराने अॅथलेटिक्समधील तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही. आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनमधील ट्रीसा जॉली व पुलेला गायत्री गोपीचंद, बॉक्सिंगमधील नरेंद्र, बधिर नेमबाजीतील धनुष श्रीकांत, हॉकीमधील लालरेमसियामी व राजकुमार पाल, कबड्डीतील सुरजित व पूजा, पॅरा नेमबाजीतील रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अॅथलेटिक्समधील एकता भ्याण, नौकायनमधील अरविंद सिंह आणि नेमबाजीतील अखिल शेओरान यांचाही गौरव करण्यात आला. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारे फुटबॉलपटू आय. अरुमय नायगम यांना 'अर्जुन' पुरस्कार (जीवनगौरव) प्रदान करण्यात आला.

यावेळी साहसी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०२४ चेही वितरण करण्यात आले. लडाखचे स्कालजांग रिग्झिन आणि हिमाचल प्रदेशच्या बलजीत कौर यांना भूमी साहस पुरस्कार, पश्चिम बंगालचे रीमो साह यांना जलीय साहस पुरस्कार, तर उत्तराखंडचे शिव प्रसाद चमोली यांना तेनझिंग नोर्गे जीवनगौरव साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिव्यांग सैनिकांच्या क्रीडा पुनर्वसनात पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोडची महत्त्वपूर्ण कामगिरी

देशसेवेदरम्यान दिव्यांगत्व आलेल्या सैनिकांचे पुनर्वसन करून त्यांना पॅरा क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड या संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. २०१७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने दिव्यांग सैनिकांना क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संस्थेच्या १५० हून अधिक खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ आणि हांगझाऊ आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांसह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ३०० हून अधिक पदके मिळविली आहेत. संस्थेच्या वतीने लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT