Narendra Modi Stadium pudhari
स्पोर्ट्स

Narendra Modi Stadium India record: अहमदाबादचा स्टेडियम खरंच 'पनौती' आहे का? टीम इंडियाची आजवरची कामगिरी वाचा

Ind Vs Nz T20 World Cup Final: टी २० वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडणार आहे.

Anirudha Sankpal

Narendra Modi Stadium India record IND vs NZ T20 WC 26 :

टी २० वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यासाठी जगातील सर्वात मोठे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालं आहे. मात्र भारताचा अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर आहे म्हटल्यावर भारतीय चाहत्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे.

याच मैदानावर १९ नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांचा ह्रदयभंग झाला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा पराभव झाल्यानं भारतीय चाहते निराश झाले होते. यावेळी आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ याच मैदानावर न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. विशेष म्हणजे भारताचा यंदाच्या टी २० वर्ल्डकपमधील एकमेव पराभव हा देखील याच मैदानावर झाला होता. भारत दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना गमावला होता. भारताला १८८ धावांचा पाठलाग करणं जमलं नव्हतं. भारतीय संघ १११ धावात गारद झाला होता.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर कशी आहे भारताची कामगिरी?

नरेंद्र मोदी स्टेडियम किंवा आधीचे मोटेरा स्टेडियम भारताचा अभेद्द किल्ला कधी राहिलेला नाही. भारतानं तीनही फॉरमॅटमध्ये या मैदानावर आतापर्यंत ४७ सामने खेळलेले आहेत. त्यातील २६ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. टी २० फॉरमॅटचा विचार केला तर भारताचं या मैदानावरचं विनिंग पर्सेंटेज हे ७० टक्के इतकं आहे. २०२१ मध्ये इंग्लंडविरूद्धचे दोन्ही सामने भारतानं याच मैदानावर गमावले आहेत. ही मालिका सूर्यकुमार यादवची पदार्पणाची मालिका होती.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारताची तीनही फॉरमॅटमधील कामगिरी

  • १९८३ ते २०२६

  • सामने - ४७

  • विजय - २६

  • पराभव - १४

  • अनिर्णित - ७

  • विजयी टक्केवारी - ६२.७७ टक्के

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारताची टी२० फॉरमॅटमधील कामगिरी

दुसरी गोष्ट म्हणजे दवाचा फॅक्टर विचारात घेता नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेस करणाऱ्या संघाला फायदा मिळायला हवा. मात्र या स्टेडियमबाबत इतिहासात असं घडताना दिसत नाही. टी २० क्रिकेटमध्ये या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १३ पैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहे. या मैदानावर फक्त ५ सामन्यात यशस्वीरित्या धावांचा पाठलाग करता आला आहे.

  • २०१२ ते २०२६

  • सामने - १०

  • विजय - ७

  • पराभव - ३

  • सर्वोच्च धावसंख्या - २३४

  • निच्चांकी धावसंख्या - १११

  • विजयी टक्केवारी - ७० टक्के

काळ्या मातीच्या पीचचं गणित

काळ्या मातीचं पीच जसजसा सामना पुढे सरकतो तसतसे संथ होत जाते. त्यामुळं चेस करण्यात अडचणी येतात. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना टी २० क्रिकेटमध्ये सरासरी १७४ धावा झाल्या आहेत. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावा या १५० आहेत. यावरूनच या मैदानावर चेस करणं किती अवघड आहे हे दिसतं.

टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये या मैदानावर आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यातील तीन संघांनी प्रथम फलंदाजी करताना सामना जिंकला आहे. दोन संघांनी त्यांना दिलेलं टार्गेट यशस्वीरित्या चेस केलं. तर एक सामना टाय झाला होता.

देशांतर्गत टी २० सामन्यांचा आणि आयपीएलचा विचार केला तर नरेंद्र मोदी स्टेडियम देखील अनप्रेडिक्टेबल राहिलं आहे. ५३ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामना जिंकला आहे. तर ४१ वेळा या मैदानावर चेस करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळं या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणं हा चांगला निर्णय ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT