स्पोर्ट्स

Hardik Pandya Fined : वेदनादायक पराभवानंतर हार्दिक पंड्याला 24 लाखांचा दंड, BCCI ची कारवाई

IPL 2025च्या 56 व्या सामन्यात, गुजरातने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या सामन्यानंतर MIचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि त्याच्या संपूर्ण संघावर BCCIने मोठ्या शिक्षेची कारवाई केली.

रणजित गायकवाड

मुंबई : गुजरात टायटन्सकडून शेवटच्या चेंडूवर झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मोठा धक्का बसला. पावसामुळे व्यत्यय आलेला सामना मुंबईने शेवटच्या चेंडूवर गमावला. या सामन्यातील पराभवानंतर, बीसीसीआयने हार्दिकच्या संघाला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावला. फक्त हार्दिकच नाही तर त्याची संपूर्ण टीमला कारवाईचा दणका बसला आहे.

खरं तर, एमआयने 147 धावांचा बचाव करताना (डीएलएसनुसार सुधारित लक्ष्य), निर्धारित वेळेत संपूर्ण षटकांचा कोटा पूर्ण केला नाही. या चुकीबद्दल, बीसीसीआयने एमआयला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवले. यासह त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला. चालू हंगामात मुंबई संघाने दुस-यांदा स्लो ओव्हर रेटची चूक केली आहे.

बीसीसीआयच्या निवेदनानुसार, पंड्याच्या संघाने या हंगामात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची चूक केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पंड्यावर 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, प्लेइंग-11 मधील इतर खेळाडूंवर, इम्पॅक्ट प्लेयर आणि कनकशन सब्स्टीट्यूट खेळाडूंवर प्रत्येकी 6 लाख रुपये आणि मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

गुजरातने जिंकला सामना

मंगळवारी (दि. 6) रात्री आयपीएल 2025 मध्ये एक रोमांचक सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला धूळ चारली. पावसामुळे सामन्यात दोनदा व्यत्यय आला. त्यामुळे गुजरातसाठी सुधारित लक्ष्य आणखी कठीण झाले. गुजरातचा संघ डकवर्थ लुईसच्या नियमानुसार स्कोअरमध्ये मागे होता. पण दीर्घ प्रतीक्षेनंतर जीटीने एक रोमांचक विजय मिळाला.

सामना 19 षटकांचा

पावसामुळे 19 षटकांत 147 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. गुजरातला शेवटच्या 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. राहुल तेवतिया आणि जेराल्ड कोएत्झी क्रीजवर होते. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने शेवटचे षटक दीपक चहरला दिले. पण चहर दबावाखाली डगमगला. तेवतिया स्ट्राईकवर होता. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. दुसर्‍या चेंडूवर एक धाव आली. तिसर्‍या चेंडूवर स्ट्राईकवर आलेल्या गेराल्ड कोएत्झीने षटकार ठोकून सामना मुंबईपासून दूर नेला. चौथ्या चेंडूवर एक धाव आली. परंतु, हा नोबॉल ठरला. फ्रीहिटवर फक्त एकच रन निघाली. सामना बरोबरीत आला. पाचव्या चेंडूवर कोएत्झी बाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. अर्शद खानने चेंडू जमिनीवरून टोलवला तो हार्दिकच्या हातात गेला. परंतु, पुरेसा वेळ असतानाही हार्दिक नीट थ्रो करू शकला नाही. अर्शदने विजयी धाव पुरी केली आणि गुजरातला महत्त्वपूर्ण दोन गुण मिळाले.

तत्पूर्वी, या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते; पण मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 155 धावा करता आल्या. मुंबईने रोहित शर्मा (7) व रायन रिकेल्टन (2) हे 26 धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व विल जॅक्स यांनी डाव सावरला. या दोघांचे कॅच सोडण्याची चूक गुजरातला महागात पडली. साई किशोरने 11 व्या षटकात सूर्याला 35 (24 चेंडूंत 5 चौकार) धावांवर झेलबाद केले. तिसर्‍या विकेटसाठी सूर्या व विल यांनी 43 चेंडूंत 71 धावांची भागीदारी केली. जॅक्स 35 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 53 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. तिलक वर्मा (7), हार्दिक पंड्या (1), नमन धीर (7) हे पटापट बाद झाले. कॉर्बिन बॉशने 27 धावांची खेळी करून संघाला 8 बाद 155 धावांपर्यंत पोहोचवले. साई किशोरने दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा, राशीद खान व गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT