Rohit Sharma IPL Record pudhari
स्पोर्ट्स

Rohit Sharma IPL Record: रोहित 'प्रकरण' केकेआरसाठी अवघडच... वॉर्नरचे रेकॉर्ड तोडून बनला डॉन, यादीत विराट कोणत्या क्रमांकावर?

Anirudha Sankpal

Rohit Sharma IPL Record: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ ची धडाक्यात सुरूवात केली आहे. वानखेडे स्टेडियमवर केकेआऱविरूद्धच्या सामन्यात त्यांनी ६ विकेट्सनी विजय मिळवत हंगामाची विजयाने सुरूवात केली. या सामन्यात रोहित शर्माने ७८ धावांची दमदार खेळी करत आपण जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं. विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध रोहित शर्माने एक मोठा विक्रम देखील केला. या विक्रमावरून केकेआरसाठी रोहित शर्मा हे प्रकरण जरा अवघडच राहिलं आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये केकेआरविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरला मागं टाकलं आहे.

१ रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने केकेआरविरूद्ध ११६१ धावा केल्या आहेत. त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रोहितने केकेआरविरूद्ध ३८ चेंडूत ७८ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा देखील समावेश होता.

२ डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने देखील केकेआरविरूद्ध सातत्यपूर्वी कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये केकेआरविरूद्ध १०९३ धावा ठोकल्या आहेत. आता वॉर्नर आयपीएल खेळत नाहीये. वॉर्नरने सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळला आहे.

३ विराट कोहली

केकेआरविरूद्ध धावा करण्याच्या बाबतीत डॉनगिरी करण्यात विराट कोहलीचा तिसरा क्रमांक लागतो. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने केकेआरविरूद्ध १०२१ धावा केल्या असून यंदाच्या आयपीएल हंगामात विराट कोहली डेव्हिड वॉर्नरला मागे टाकून यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो. केकेआर आणि आरसीबीचा १३ मे रोजी सामना होणार आहे. हा सामना रायपूरमध्ये होईल.

४ शिखर धवन

भारताचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा शिखर धवन केकेआरविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने केकेआरविरूद्ध ९०७ धावा केल्या असून धवन २०२४ मध्ये शेवटचा आयपीएल खेळला होता. धवन पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्ससह ५ संघांचा भाग राहिला आहे.

५ सुरेश रैना

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार माजी फलंदाज सुरेश रैनाची देखील केकेआर ही फेव्हरेट टीम राहिली आहे. केकेआरविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रैना हा पाचव्या स्थानावर आहे. डावखुऱ्या सुरेश रैनाने ८२९ धावा केल्या आहेत. मात्र आता तो आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून त्याने २०२१ मध्ये आयपीएलचा शेवटचा सामना खेळला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT