

Most Sixes in 2025:
नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानात २०२५ हे वर्ष षटकारांच्या आतषबाजीसाठी ओळखले जाईल. मात्र, या वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार ठोकण्याचा मान एका अशा खेळाडूने मिळवला आहे, ज्याचे नाव ऐकून दिग्गजही चकित होतील. ऑस्ट्रियाच्या करनबीर सिंह याने २०२४ मध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका वर्षातच षटकारांचा नवा बादशाह म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
२०२५ मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याच्या यादीत करनबीर सिंह अव्वल स्थानी आहे. त्याने या वर्षात ३२ सामने खेळताना तब्बल १२२ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, या कालावधीत १०० षटकारांचा आकडा पार करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. हे सर्व षटकार त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये मारले आहेत.
आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य देशांचा विचार केल्यास, दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस ६५ षटकारांसह (३० सामने) तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या अभिषेक शर्माने २१ सामन्यांत ५४ षटकार ठोकून आपली छाप पाडली आहे. वेस्ट इंडिजच्या शे होपच्या नावेही ५४ षटकार नोंदवले गेले आहेत.
कसोटी क्रिकेट (Test) : ऋषभ पंतचा जलवा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्याने ७ कसोटी सामन्यांत सर्वाधिक २६ षटकार लगावले. त्याच्यापाठोपाठ शुभमन गिलने १५ षटकारांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
वनडे क्रिकेट (ODI): जॉर्ज मंसी अव्वल, रोहित दुसऱ्या स्थानी वनडे क्रिकेटमध्ये स्कॉटलंडच्या जॉर्ज मंसीने ११ सामन्यांत ३४ षटकार खेचत अव्वल स्थान गाठले. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १४ सामन्यांत २४ षटकार मारले आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I): असोसिएट देशांचे वर्चस्व टी-२० फॉरमॅटमध्ये असोसिएट देशांच्या खेळाडूंनी मोठ्या देशांच्या खेळाडूंना मागे टाकले आहे. करनबीर सिंह (१२२ षटकार) नंतर बहरीनच्या फियाज अहमदचे नाव येते, ज्याने ६९ षटकार ठोकले आहेत.