MS Dhoni IPL Retirement Pudhari
स्पोर्ट्स

MS Dhoni IPL Retirement: 'माही, तुझा नेहमीच...', धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावुक; शेअर केली खास पोस्ट, चाहत्यांसाठी काय लिहिलं?

MS Dhoni IPL Retirement: धोनीला वर्षानुवर्षे प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे साक्षीने मनापासून आभार मानले आहेत.

Rahul Shelke

MS Dhoni IPL Retirement: आयपीएलमधून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्ती नंतर त्याची पत्नी साक्षी धोनीची भावुक प्रतिक्रिया समोर आली आहे. साक्षीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत धोनीच्या क्रिकेट प्रवासात साथ देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच, 'माही, मला तुझा नेहमीच अभिमान राहील,' अशा शब्दांत तिने धोनीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, काही अध्याय संपणं गरजेचं असतं, जेणेकरून नव्या अध्यायांची सुरुवात होऊ शकेल. गेल्या अनेक वर्षांपासून माहीवर प्रेम करणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे तिने मनापासून आभार मानले.

चाहत्यांना उद्देशून साक्षी म्हणाली की, तुम्ही आम्हाला वैयक्तिकरीत्या ओळखत असाल किंवा नसाल, तरीही तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कायम ऋणी राहू. नव्या सुरुवातीसाठी, नव्या अनुभवांसाठी आणि अनेक सुंदर आठवणींसाठी शुभेच्छा. माही, मला तुझा नेहमीच अभिमान राहील.

चेन्नई सुपर किंग्समध्ये धोनीची नवी भूमिका

महेंद्रसिंग धोनी आता आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून मैदानात दिसणार नसला, तरी चेन्नई सुपर किंग्सशी त्याचे नाते कायम राहणार आहे. फ्रँचायझीने त्याच्यावर संघाच्या मार्गदर्शकाची (मेंटर) जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात धोनी संघासोबत नव्या भूमिकेत दिसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा बनवले चॅम्पियन

धोनीचा आयपीएलमधील प्रवास अतिशय जबरदस्त राहिला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून एकूण १६ सिझन खेळले. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

२०१० मध्ये धोनीने पहिल्यांदा चेन्नईला चॅम्पियन बनवले. त्यानंतर २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्येही संघाने विजेतेपद मिळवले. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात धोनीचे नाव सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये घेतले जाते.

फिनिशर आणि कर्णधार म्हणून धोनीची कायम आठवण राहणार

धोनी केवळ एक उत्कृष्ट फलंदाज नव्हता, तर दबावाच्या परिस्थितीत संघाला विजय मिळवून देणारा फिनिशर होता. मैदानावरील शांत स्वभाव, अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि संघातील खेळाडूंना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. आयपीएलमधील त्याचा प्रवास संपला असला, तरी त्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT