MS Dhoni On Ruturaj CSK Captaincy advice: महेंद्रसिंह धोनी यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राऊंड चेपॉकवर खेळणार का नाही याबाबत मोठा सभ्रम निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळी त्याने संघासोबत सराव केला. वॉर्म अप करून त्याने नेट्समध्ये फलंदाजी केली. तो मोठमोठे फटके मारत होता. त्यामुळं तो चांगल्या टचमध्ये असल्याचेही जाणवले.
मात्र चेन्नई सुपर किंग्जने धोनी सीजनचा होम ग्राऊंडवरचा शेवटचा सामना खेळणार की नाही याबाबत अजून काही स्पष्ट केलेलं नाही. मात्र फ्रेंचायजीकडून धोनी दर वर्षी हंगामातील होम ग्राऊंडवरील शेवटच्या सामन्यावेळी चाहत्यांसाठी जे काही इव्हेंट करतो ते सर्व इव्हेट करणार असल्याचं सांगण्यात आलं.
धोनी यंदाच्या हंगामात मैदानात उतरलेला नसला तरी तो संघाचा एक अविभाज्य घटक आहे. तो सराव सत्रादरम्यान खेळाडूंशी संवाद साधत असतो. त्याने कर्णधार ऋतुराज गायकवाडला सल्ला देण्याबाबत देखील भाष्य केलं आहे.
धोनी सीएसकेचे स्पॉन्सर्सनी आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये म्हणतो, 'मी ऋतूला तुला जशी सीएसके चालवायची आहे तशी तू चालव असं सांगितलं आहे. मी देखील त्याच प्रकारे सीएसके दीर्घकाळ चालवली होती. मला असं वाटतं की सामन्यावेळी कर्णधारालाच निर्णय घ्यायचे असतात. तुमच्यासोबत कोच आणि सपोर्ट स्टाफ असतो मात्र फुटबॉल सारखं मॅनेज निर्णय घेऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये कर्णधाराला निर्णय घ्यावा लागतो.'
धोनी म्हणाला की, ऋतुराज माझ्याकडून काही गोष्टी घेऊ शकतो. मात्र प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. तुम्हाला जे वाटतं ती तुमची स्टाईल असते. तुम्हाला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं.'
धोनीने ऋतुराजला सल्ला देण्याबाबत देखील भाष्य केलं आहे. धोनी म्हणतो, 'मी खूप खुला आहे. मी तुझ्याकडे येवून तुझ्याशी बोलणार. मात्र मी जे काही बोलला आहे त्यातील एकही गोष्ट तू करावीच असं नाही. जर मी तुला १० सल्ले दिले असतील आणि त्यातील तू एकही मानला नाहीस तरी ठीक आहे. ते योग्य आहे. ज्यावेळी तुम्ही लीडर असता त्यावेळी तुम्हाला त्याची जबाबदारी घ्यायची असते. एक लीडर म्हणून तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहेत आणि त्याचा कसा वापर करून घ्यायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे.'
धोनीने सीएसकेच्या यशाबाबत बोलताना एक महत्वाची गोष्ट सांगितल तो म्हणाला, 'आम्ही क्रिकेटवर जास्त भर देण्यावर विश्वास ठेवला. आम्हाला क्रिकेट संबंधित इतर देखील अनेक गोष्टी करायचा असतात. मात्र एक फ्रेंचायजी म्हणून आम्हाला माहिती होतं की या सर्वाचा गाभा हा क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेटलाच जास्त महत्व द्यायचं आहे.'