MS Dhoni On T20 World Cup Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup: भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो, पण... धोनीने केली भविष्यवाणी; काय म्हणाला कॅप्टन कूल?

T20 World Cup: महेंद्र सिंह धोनीने आगामी ICC Men's T20 World Cup मध्ये टीम इंडियाचा संघ हा जगातील सर्वात धोकादायक संघांपैकी एक असेल, असा विश्वास व्यक्त केला.

Rahul Shelke

MS Dhoni On T20 World Cup: आगामी ICC Men's T20 World Cup बाबत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मोठं वक्तव्य केलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा संघ हा “जगातील सर्वात धोकादायक संघांपैकी एक” असेल, असा विश्वास धोनीने व्यक्त केला आहे. मात्र, एका गोष्टीमुळे मी अजूनही अस्वस्थ होतो, असं धोनी म्हणाला.

धोनीने सांगितलं की, भारतीय संघाकडे अनुभव आहे, दबावाखाली खेळण्याची सवय आहे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी तयारी सुरू झाली आहे. “चांगला संघ बनण्यासाठी लागणाऱ्या जवळपास सगळ्या गोष्टी भारताकडे आहेत,” असं धोनी म्हणाला.

या विश्वचषकात भारताचा गट ‘ए’ मध्ये समावेश असून त्यात पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका हे संघ आहेत. पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे भारताला त्या सामन्यात वॉकओव्हर मिळण्याची शक्यता आहे.

पण धोनीला नेमकी कोणती गोष्ट खटकते?

धोनी म्हणाला, “मला सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे ड्यू. सामना खेळताना ड्यू आला की सामना पूर्णपणे बदलतो. टॉसही खूप महत्त्वाचा असतो. मी खेळत असतानाही हीच गोष्ट मला सर्वाधिक भीतीदायक वाटायची.”

तो पुढे म्हणाला की, जर परिस्थिती चांगली राहिली, तर जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध दहा सामने खेळले, तरी भारत जिंकू शकतो. मात्र टी-20 क्रिकेटमध्ये अडचण तेव्हा होते, जेव्हा टीममधील दोन-तीन महत्त्वाच्या खेळाडूंचा एकाच वेळी खराब फॉर्म असतो आणि अशावेळी समोरच्या संघातील एखादा खेळाडू अप्रतिम खेळ करतो.

“असं लीगमध्ये झालं तर ठीक, पण नॉकआऊटमध्ये झालं तर मग आपल्याला नशीब आणि प्रार्थना या दोन्हींची गरज असते. कोणी जखमी होऊ नये, सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्यात, एवढीच अपेक्षा. तसं झालं, तर हा संघ जगातील सर्वात धोकादायक संघांपैकी एक ठरू शकतो,” असं धोनी म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT