

Anthropic AI Indian IT stocks: आज सकाळी शेअर बाजार उघडताच आयटी क्षेत्रात खळबळ उडाली. Infosys, Tata Consultancy Services, HCL Technologies, Tech Mahindra आणि Wipro या मोठ्या आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळले. सकाळी साडेनऊपर्यंत अनेक शेअर्स जवळपास 6 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दलाल स्ट्रीटवर वातावरण तणावपूर्ण होतं. या घसरणीचं कारण भारतात नव्हतं. ही विक्री अमेरिकेत सुरू झाली आणि त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
मंगळवारी रात्री अमेरिकेतील नॅस्डॅक निर्देशांकात मोठी घसरण झाली. यामागचं मुख्य कारण होतं AI क्षेत्रातील मोठी घोषणा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी Anthropic ने नवे ‘एंटरप्राइज AI टूल’ आणलं आहे.
हे AI टूल डॉक्युमेंट प्रोसेसिंग, कॉम्प्लायन्स चेकिंग, ऑपरेशनल अॅनालिसिस आणि बॅक-ऑफिस कामं थेट ऑटोमेट करू शकतं, असा दावा करण्यात आला आहे. ही बातमी येताच अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी पारंपरिक आयटी सर्व्हिस कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करायला सुरुवात केली. याचा परिणाम लगेच Infosys आणि Wipro च्या ADRs वर झाला आणि भारतात बाजार उघडेपर्यंत विक्रीचा जोर वाढला.
खरं तर भारतीय आयटी शेअर्स आधीच महाग झाले आहेत अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या नवीन डील्स होत नाहीत आणि अमेरिका आणि युरोपमधील ग्राहक खर्च कमी करत आहेत. अशा परिस्थितीत बाजार आधीच अस्वस्थ होता. त्यातच AI मुळे आउटसोर्सिंग धोक्यात येईल, अशी भीती निर्माण झाली आहे आणि गुंतवणूकदारांनी लगेच विक्री सुरू केली.
भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा महसूल परदेशी ग्राहकांकडून, विशेषतः अमेरिकेतून येतो. त्यामुळे AI मुळे पारंपरिक आउटसोर्सिंग कमी होईल, अशी शंका जरी निर्माण झाली तरी शेअर बाजार पटकन कोसळतो.
याचा अर्थ असा नाही की भारतीय आयटी मॉडेल संपलं आहे. पण गुंतवणूकदारांना आता हे पाहायचं आहे की भारतीय कंपन्या AI शी किती वेगाने जुळवून घेतात. बहुतेक आयटी कंपन्या आधीच क्लाउड, ऑटोमेशन आणि AI आधारित सेवांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
मात्र बाजाराला खात्री हवी आहे की हे बदल भविष्यात कमाई करु शकतात. महत्त्वाचं म्हणजे, भारतीय आयटी क्षेत्र अजूनही जगातील सर्वात मजबूत उद्योगांपैकी एक आहे. मनुष्यबळ, स्केल आणि जागतिक ग्राहक याबाबतीत भारताकडे मोठी ताकद आहे.
सध्या शेअर बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक AI कंपन्यांकडून होणारी प्रत्येक नवी घोषणा आयटी शेअर्सवर परिणाम करू शकते. AI आता फक्त चर्चेचा विषय राहिलेला नाही. तो थेट शेअर बाजार, गुंतवणूक निर्णय आणि उद्योगावर परिणाम करत आहे. आता भारतीय आयटी कंपन्यांना हे सिद्ध करावं लागेल की AI हा धोका नाही, तर संधी आहे.