दुबई : भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत ८ वेळा आशिया चषक जिंकून या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आपला दबदबा राखला आहे. याचदरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या नावावर एक असा अनोखा विक्रम आहे, जो अजूनही कोणीही मोडू शकलेले नाही.
यंदा म्हणजेच २०२५ ची आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेटप्रेमींना २०१६ सालच्या टी-२० आशिया चषक स्पर्धेची आठवण ताजी झाली आहे. ती स्पर्धा भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. तो विजय केवळ एका ‘ट्रॉफी’ पुरता नव्हता, तर धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला होता.
भारतीय कर्णधारांमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा या तिघांनी प्रत्येकी दोनदा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पण, या तिघांमध्ये फक्त धोनी असा आहे, जो वनडे (२०१०) आणि टी-२० (२०१६) या दोन्ही फॉरमॅटमध्ये आशिया चषकावर नाव कोरण्यात यशस्वी झाला आहे. आशिया खंडात असा विक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. हा विक्रम आजही अबाधित आहे आणि भविष्यात तो मोडणे कोणत्याही कर्णधारासाठी मोठे आव्हान असेल.
२०२२ च्या आशिया चषकमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले होते आणि आता पुन्हा एकदा भारत टी-२० फॉरमॅटमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघ १० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघाचा गट टप्प्यातील शेवटचा सामना ओमान विरुद्ध १९ सप्टेंबर रोजी अबु धाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'सुपर-४' मध्ये पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे.