लंडन : येथील ऐतिहासिक केनिंग्टन ओव्हल मैदानावर ४ ऑगस्ट रोजी झालेल्या एका रोमहर्षक कसोटी सामन्यात, भारताने यजमान इंग्लंडवर केवळ ६ धावांनी मात करत विजयश्री खेचून आणली. या विजयासह भारताने या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग दुसरा कसोटी विजय नोंदवला आहे. तथापि, भारताचा ओव्हलवरील एकूण विक्रम फारसा प्रभावी राहिलेला नाही. येथे खेळलेल्या १६ कसोटी सामन्यांपैकी भारताला केवळ तीन सामन्यांत विजय मिळवता आला आहे. याच मैदानावर झालेल्या मागील कसोटी सामन्यात (विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ अंतिम सामना) ऑस्ट्रेलियाकडून भारताला २०९ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता.
विशेष म्हणजे, ओव्हलवर भारताला मिळालेल्या तिन्ही ऐतिहासिक विजयांमध्ये नाणेफेक, दुसरा डाव आणि मुंबई शहराशी एक विलक्षण नाते असल्याचे दिसून येते. भारताच्या या तिन्ही विजयांमधील विशेष योगायोगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ऑगस्ट १९७१ : या सामन्यात भारताने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात १०८.४ षटकांत सर्वबाद ३५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारताचा पहिला डाव ११७.३ षटकांत २८४ धावांवर संपुष्टात आला.
यानंतर, इंग्लंडचा दुसरा डाव केवळ ४५.१ षटकांत १०१ धावांतच गडगडला. विजयासाठी मिळालेले १७४ धावांचे लक्ष्य भारताने ६ गडी गमावून १०१ षटकांत पूर्ण केले. भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार अजित वाडेकर यांनी सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली.
विशेष योगायोग : इंग्लंडने नाणेफेक जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली. अजित वाडेकर (मुंबई) हे दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले.
सप्टेंबर २०२१ : या सामन्यात भारताने इंग्लंडवर १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव ६१.३ षटकांत केवळ १९१ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, इंग्लंडने पहिल्या डावात ८४ षटकांत सर्वबाद २९० धावा करत आघाडी घेतली.
मात्र, दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या शानदार शतकाच्या (१२७ धावा) जोरावर भारताने १४८.२ षटकांत ४६६ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु त्यांचा संघ ९२.२ षटकांत २१० धावांवरच सर्वबाद झाला. भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
विशेष योगायोग : इंग्लंडने नाणेफेक जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली. रोहित शर्मा (मुंबई) हा दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
ऑगस्ट २०२५ : या सामन्यात भारताने इंग्लंडवर ६ धावांनी रोमहर्षक विजय संपादन केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६९.४ षटकांत २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ५१.२ षटकांत सर्वबाद २४७ धावा करून आघाडी मिळवली.
भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या दमदार शतकाच्या (११८ धावा) बळावर ८८ षटकांत ३९६ धावा केल्या. विजयासाठी ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ८५.१ षटकांत ३६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
विशेष योगायोग : इंग्लंडने नाणेफेक जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात आघाडी घेतली. यशस्वी जयस्वाल (मुंबई) हे दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले.
ओव्हलवरील भारताच्या विजयांमध्ये मुंबईच्या फलंदाजांप्रमाणेच हैदराबादच्या खेळाडूंचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे दिसून येते.
१९७१: ओव्हलवरील भारताच्या पहिल्या कसोटी विजयात हैदराबादच्या आबिद अली यांनी विजयी धाव घेतली होती.
२०२५: ओव्हलवरील ताज्या कसोटी विजयात हैदराबादच्या मोहम्मद सिराजने अखेरचा बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.