Mitchell Santner India vs New Zealand file photo
स्पोर्ट्स

Mitchell Santner: पराभवानंतरही न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकली मने! पाहा, भारतीय संघाबद्दल तो काय म्हणाला?

India T20 World Cup 2026 win: टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने भारताबद्दल केलेल्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

मोहन कारंडे

Mitchell Santner India vs New Zealand:

अहमदाबाद: टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताकडून ९६ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला असला, तरी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने आपल्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली आहेत. "आज मैदानात सर्वत्र निळ्या रंगाचा महासागर दिसत होता," असे म्हणत सँटनरने भारतीय चाहत्यांच्या उत्साहाचे आणि टीम इंडियाच्या वर्चस्वाचे कौतुक केले.

रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात कीवी संघ १९ षटकांत अवघ्या १५९ धावांत गारद झाला. सॅमसन, शर्मा, किशन व दुबेचा फलंदाजीतील झंझावात आणि बुमराह पटेलच्या एकत्रित ७ बळींच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केले. भारत टी-२० विश्वचषक जेतेपद आपल्याकडेच कायम राखणारा पहिलाच विद्यमान जेता ठरला. या पराभवामुळे न्यूझीलंडचे पहिल्यांदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

'माझ्या संघाचा अभिमान वाटतो'

सामन्यानंतर बोलताना सँटनर भावूक झाला पण त्याने संघाच्या कामगिरीचे समर्थन केले. तो म्हणाला, "इथपर्यंत पोहोचल्याबद्दल मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत आमच्यासमोर अनेक आव्हाने होती, पण प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यातून मार्ग काढला. आज आमचा सामना एका अत्यंत बलाढ्य संघाशी होता. आम्ही हरलो असलो तरी आमच्या प्रवासाचा मला अभिमान आहे."

भारतीय चाहत्यांचे मानले आभार

भारतात न्यूझीलंडला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल विचारले असता सँटनर म्हणाला, "आम्ही जिथे कुठे खेळतो तिथे प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. पण आजचे दृश्य वेगळे होते; पूर्ण मैदान निळ्या रंगाने न्हाऊन निघाले होते. आम्ही अर्थातच येथील फेव्हरेट नव्हतो, पण घरच्या मैदानावर जेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक व्हायलाच हवे. घरच्या मैदानावर, प्रेक्षकांच्या अपेक्षांच्या दबावाखाली खेळणे सोपे नसते. सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमला त्यांच्या खेळाचा अभिमान वाटायला हवा."

लढवय्या कीवी संघाचे कौतुक

स्पर्धेतील सकारात्मक गोष्टींवर बोलताना सँटनरने सांगितले की, "आमच्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली. सुपर-८ आणि उपांत्य फेरीत आम्ही उत्कृष्ट खेळ केला. आज एका सरस संघाने आम्हाला पराभूत केले, हे आम्हाला मान्य आहे. पण माझ्या खेळाडूंनी मान वर काढूनच मायदेशी फिरायला हवे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT