पाकिस्‍तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक. File Photo
स्पोर्ट्स

Misbah ul Haq : पाकिस्‍तान क्रिकेटला आणखी एक धक्‍का; मिसबाह-उल-हकने दिला निवड समिती सदस्यपदाचा राजीनामा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवानंतर कसोटी संघ आणि कोचिंग स्टाफमध्ये तडकाफडकी मोठे बदल

पुढारी वृत्तसेवा

Misbah ul Haq resigns PCB selector

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय भूकंप झाला आहे. कसोटी संघ आणि कोचिंग स्टाफमध्ये तडकाफडकी मोठे बदल करण्यात आल्यानंतर, माजी कर्णधार मिसबाह-उल-हक याने पीसीबीच्या राष्ट्रीय निवड समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

मिसबाह-उल-हकने दिला राजीनामा

'जिओ न्यूज'च्या माहितीनुसार, मिसबाहने आपल्या निर्णयाबाबत पीसीबीला कळवले असून तो सध्या नोटीस कालावधी पूर्ण करत आहे. 'क्रिकइन्फो'ने दिलेल्या वृत्तानुसार मिसबाहने राजीनामा सादर केला असला, तरी पीसीबीने तो अद्याप अधिकृतपणे स्वीकारलेला नाही.लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडकडून तब्बल १९४ धावांनी पराभूत झाल्यानंतर पीसीबीने संघ आणि प्रशिक्षकांमध्ये मोठे फेरबदल केले. या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मिसबाहने हे पाऊल उचलले आहे.

मोठ्या बदलांमध्ये दुर्लक्ष केल्याने नाराजी?

मिसबाह राष्ट्रीय निवड समितीत असूनही संघ आणि प्रशिक्षकांमधील या मोठ्या बदलांबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा केली गेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. यामुळेच नाराज होऊन त्याने राजीनामा दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तब्बल ७ खेळाडूंना संघातून केले मुक्त

एजबॅस्टन येथे ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी पीसीबीने तब्बल ७ खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. यामध्ये मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, अली उस्मान, आमीर जमाल, उवैस जफर आणि खुर्रम शहजाद यांचा समावेश आहे. याशिवाय सरफराज अहमद (मुख्य प्रशिक्षक) आणि उमर गुल (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी मायक हेसन आणि ॲशली नोफ्के यांच्याकडे उर्वरित दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.यासोबतच मिसबाहने लाहोर येथील 'नॅशनल क्रिकेट अकादमी'च्या फलंदाजी सल्लागार पदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

संघात ५ नवोदित खेळाडूंचा समावेश

तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघात ५ अननुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अरफत मिन्हास, मोहम्मद इम्रान ज्युनियर, साद बेग, मोहम्मद इम्रान रंधावा आणि रझाउल्लाह यांचा संघात समावेश झाला आहे. याशिवाय सॅम अयुब आणि अब्दुल्ला फझल यांनाही संधी मिळाली आहे.तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत डावाने आणि दुसऱ्या कसोटीत १९४ धावांनी झालेला पराभव यामुळे पाकिस्तानवर ३-० अशा व्हाईटवॉशचे सावट आहे.

मिसबाह २०१९ मध्‍ये होता मुख्‍य प्रशिक्षक

मिसबाहची मार्च महिन्यात आकिब जावेद, सरफराज अहमद आणि असद शफिक यांच्यासोबत चार सदस्यीय निवड समितीत नियुक्ती झाली होती. याआधी २०१९ मध्ये तो मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता होता. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ सध्या तळाला आहे.

बर्मिंगहॅम कसोटीसाठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फझल, अरफत मिन्हास, अझान उवैस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद इम्रान, मोहम्मद इम्रान ज्युनियर, मोहम्मद गाझी घोरी (यष्टीरक्षक), रझाउल्लाह, साद बेग (यष्टीरक्षक), सॅम अयुब, साजिद खान, सौद शकील, शान मसूद, अब्दुल्ला शफिक, उबेद शाह.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT