IPL Fan Fight Viral Video Pudhari
स्पोर्ट्स

Watch: IPL सामन्यात प्रेक्षकांमध्ये तुफान राडा; स्टेडियममध्ये लाथाबुक्क्यांनी हाणामारी, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

IPL Fan Fight Viral Video: लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये IPL सामन्यादरम्यान दोन चाहत्यांमध्ये जोरदार मारामारी झाली. या घटनेत लाथाबुक्क्यांसह चप्पलनेही मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

IPL Fan Fight Viral Video: IPL 2026 दरम्यान लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मैदानावरील खेळाइतकीच प्रेक्षकांमधील मारामारीची चर्चा होत आहे. सामना सुरू असतानाच दोन चाहत्यांमध्ये जोरदार भांडण झाले आणि काही क्षणांतच हा वाद लाथाबुक्क्यांपर्यंत पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा प्रकार लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीने दुसऱ्याला जोरात ढकलून खाली पाडले. तो व्यक्ती खालील रांगेत जाऊन पडला. मात्र काही क्षणांतच तो पुन्हा उठला आणि दोघांमध्ये पुन्हा जोरदार हाणामारी सुरू झाली.

या गोंधळात एका व्यक्तीने चप्पल काढून दुसऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आजूबाजूला बसलेले प्रेक्षक घाबरून दूर सरकत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर एकजण सुरक्षा रक्षकांना बोलावण्यासाठी ओरडताना दिसला.

दरम्यान, मैदानावरचा सामना देखील रंगतदार झाला होता. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 159 धावा केल्या. रवींद्र जडेजाने नाबाद 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर हे लक्ष्य आव्हानात्मक मानले जात होते.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. आयुष बडोनी, ऋषभ पंत आणि एडन मार्क्रम शून्यावर बाद झाले. मिचेल मार्शने 55 धावांची झुंजार खेळी केली, पण त्यामुळे संघाला विजय मिळवता आला नाही. अखेर लखनऊचा डाव 119 धावांवर संपला आणि राजस्थानने 40 धावांनी सामना जिंकला.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर नांद्रे बर्गर आणि बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रविंद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT