नवी दिल्ली : आयपीएल 2025 आता अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचले आहे. सर्व संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याची लढाई तीव्र झाली आहे. मंगळवारी (22 एप्रिल) लखनौ येथे खेळल्या गेलेल्या हंगामातील 40 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह हा संघ 12 गुण मिळवून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता ते प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून फक्त दोन विजय दूर आहेत. या सामन्यात, एलएसजीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आणि स्कोअरबोर्डवर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात, केएल राहुलच्या नाबाद 57 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर डीसीने 13 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.
केएल राहुलने लखनौविरुद्ध षटकार मारत दिल्लीला आयपीएल 2025 मधील दुसरा विजय मिळवून दिला. या सामन्यात केएलने 42 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह, त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. त्याने ही किमया सर्वात कमी 130 डावांमध्ये डावांमध्ये केली. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर होता, ज्याने 135 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. तर विराट कोहलीने इतक्या धावा करण्यासाठी 157 डाव खेळले होते.
केएल राहुल : 130 डाव
डेव्हिड वॉर्नर : 135 डाव
विराट कोहली : 157 डाव
एबी डिव्हिलियर्स : 161 डाव
शिखर धवन : 168 डाव
सुरेश रैना : 173 डाव
रोहित शर्मा : 187 डाव
एमएस धोनी : 208 डाव