lords test day 5 ind vs eng 3rd test ravindra jadeja vs brydon carse
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामना अत्यंत वादळी ठरला आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी (14 जुलै) देखील भारतीय आणि इंग्लिश खेळाडूंमध्ये मैदानावर तणाव दिसून आला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स यांच्यात वादावादी झाली.
ही घटना भारताच्या दुसऱ्या डावात ३५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आणि त्यानंतर घडली. जडेजा तो चेंडू खेळून पहिल्या धावेसाठी धावत असताना, त्याची ब्रायडन कार्सशी टक्कर झाली. ब्रायडन कार्सदेखील चेंडूच्या दिशेने धावत होता. दोघांचेही लक्ष चेंडूवर असल्याने, ते एकमेकांना पाहू शकले नाहीत आणि मैदानावरच त्यांची टक्कर झाली.
या टक्करीनंतर ब्रायडन कार्स संतापला आणि षटक संपल्यानंतर तो रवींद्र जडेजाला काहीतरी बोलताना दिसला. आपले लक्ष केवळ चेंडूवर होते, असे जडेजाने हावभावांनी सांगितले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दोघांमध्ये हस्तक्षेप करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पंचांनीही यात हस्तक्षेप करून कार्स तसेच स्टोक्स यांच्याशी चर्चा केली.
यापूर्वी, लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१२ जुलै) अखेरच्या सत्रात भारतीय कर्णधार शुभमन गिलची इंग्लंडचा फलंदाज जॅक क्राउलीशी शाब्दिक चकमक उडाली होती. तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडला केवळ एकच षटक खेळावे लागावे, यासाठी क्राउली वेळ वाया घालवत होता. त्यावेळी मैदानातील वातावरण बरेच तापले होते. त्यानंतर चौथ्या दिवशीच्या (13 जुलै) खेळात मोहम्मद सिराजने बेन डकेटला बाद केल्यानंतर आक्रमकपणे आनंद साजरा केला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सिराजवर सामन्याच्या मानधनाच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावला.