Kyle Jamieson found guilty: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याने असं काही केलं की त्याच्यावर आयपीएल कोड ऑफ कंडक्टचे पालन न केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलचा ४३ वा सामना खेळवण्यात आला. त्यावेळी कायल जेमिसनने कलम २.५ चा लेव्हल १ चा गुन्हा केला. त्यात दोषी आढललेल्या कायलच्या मॅच फीमधून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. कायलने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत.
राजस्थान रॉयल्स फलंदाजी करत असताना दुसऱ्याच षटकात ही घटना घडली होती. गोलंदाज जेमिसनने एक जोरदार यॉर्कर राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला टाकला. ४ धावांवर खेळणाऱ्या वैभवने हा यॉर्कर आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन थेट स्टम्पवर आदळला. वैभव सूर्यवंशी क्लीन बोर्ड झाला.
मात्र १५ वर्षाच्या वैभवला बाद केल्यानंतर उंच पुऱ्या कायल जेमिसनने अत्यंत आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं. तो आक्रमकपणे फलंदाजाच्या जवळ गेला अन् त्याच्या डोळ्यात डोळे घालून खुन्नस देऊ लागला. यामुळं वादाचा प्रसंग उद्भवला असता. कायलने १५ वर्षाच्या वैभवला सेंड ऑफ देताना मर्यादा ओलांडली.
दरम्यान, संपूर्ण सामन्यात हा क्षण चर्चेचा मुद्दा ठरला. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांनी याच्यावर भाष्य केलं. अनेकांना ही क्रिकेटमधील इन्टेन्सिटी वाटली तर अनेकांनी अशा प्रकारे एका १५ वर्षाच्या क्रिकेटपटूविरूद्ध आक्रमकता दाखवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सला राजस्थानविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. दिल्लीने २२६ धावांचे आव्हान सात विकेट्स आणि पाच चेंडू राखून पार केले. केएल राहुलने ४० चेंडूत ७५ धावांची खेळी केली. तर निस्संकाने ३३ चेंडूत ६२ धावांचे योगदान दिलं. सलामी जोडीने ११० धावांची भागीदारी रचल्याने दिल्लीला सामन्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर नितीश राणाने १७ चेंडूत ३३ धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी राजस्थानकडून रियान परागने ५० चेंडूत ९० धावा ठेकत संघाला २ बाद १२ धावांपासून २२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने ध्रुव जुरेलसोबत १०२ धावांची भागीदारी रचली. जुरेलने ४२ धावांचे योगदान दिले. मात्र दिल्लीच्या कसलेल्या फलंदाजीसमोर या धावा तुटपुंज्या ठरल्या.