Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy: भारताचे माजी खेळाडू आणि सलामीवर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केलं आहे. श्रीकांत यांच्या मतानुसार तरूण फलंदाज आगामी काळात जागतिक क्रिकेटमधील एक सर्वात मोठा स्टार खेळाडू म्हणून उदयास येईल.
कृष्णमाचारी श्रीकांत यांनी वैभवचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे त्याची बिंधास्त वृत्ती आहे असे सांगितले. तो फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजांच्या आत्मविश्वासावर आघात करतो. श्रीकांतने आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की वैभवला योग्य प्रकारे तयार केलं गेलं तर तो जगातील मोठं नाव असलेला क्रिकेटपटू होऊ शकतो.
कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या मते एवढ्या कमी वयात मिळालेल्या यशानंतर आता वैभवला सर्वात महत्वाच्या गोष्टीची म्हणजे योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. श्रीकांत म्हणाले की, 'तो जबरदस्त खेळत आहे. त्याला प्रोत्साहित करायला हवं. त्याला कधी डिमोटिव्हेट करून चालणार नाही. जर त्याला योग्य पद्धतीनं तयार केलं तर तो पुढचा सुपरस्टार आहे. तो कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा त्याच्या गौरवशाली स्थितीत पोहचवू शकतो.'
श्रीकांत यांनी सांगितलं की, 'वैभव सूर्यवंशीमुळे प्रत्येक जण दुलीप ट्रॉफी पाहत आहे. एवढंच काय तर माझी पत्नी देखील त्याच्यामुळेच दुलीप ट्रॉफी पाहत होती. पुढे जाऊन वैभव सूर्यवंशी हा जागतिक क्रिकेटसाठी एक मोठी अॅसेट झालेला असेल.'
वैभवने सेंट्रल झोनविरूद्ध खेळताना दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये ८१ चेंडूत ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली. दुसऱ्या डावात देखील त्याने ४० धावांचे योगदान दिले. त्यामुळं पूर्व विभागाने हा सामना ४ विकेस्ट राखून जिंकला. दुलीप ट्रॉफीत अर्धशतक करणारा वैभव हा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे.
श्रीकांत म्हणतात की वैभव उच्च स्तरावर चांगलं क्रिकेट खेळू शकतो की नाही याबाबत चर्चा करत होते. मात्र वैभव प्रत्येक स्तरातील क्रिकेट उत्तम खेळू शकतो. तो लवकरच सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये जागवर अधिराज्य गाजवताना दिसेल. कसोटी क्रिकेटमध्येही तो मध्य गती गोलंदाजांना समोर षटकार मारत आहे. तो गोलंदाजांसोबत एकप्रकारे चेष्टाच करत आहे.