

Vaibhav Sooryavanshi Bowling Video: भारतीय कसोटी संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथं तो दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुसरीकडं भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी मायदेशात दुलीप ट्रॉफी खेळत आहे. त्याची कसोटी संघात निवड न झाल्यानं तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली बॅट आजमावत आहे.
आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीमध्ये एक मोठा कारनामा केला आहे. त्याने क्वार्टर फायनल सामन्यात इस्ट झोनकडून खेळताना बॅटने नाही तर बॉलने कमाल केली. तो त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे नाही तर भेदक गोलंदाजीमुळं चर्चेत आला आहे. त्यामुळं आता सूर्यवंशी हा फक्त फलंदाज उरलेला नाही आता तो अष्टपैलू खेळाडू म्हणून डेव्हलप होताना दिसत आहे.
वैभव सूर्यवंशीने नॉर्थ झोनविरूद्धच्या सामन्यात एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या. नॉर्थ झोनवर आधीच फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे. त्यात आता ते लाजीरवाणा पराभव टाळण्यासाठी खेळत आहेत.
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी हा इस्ट झोनचा उपकर्णधार आहे. इशान किशनच्या नेतृत्वाखाली वैभव खेळत आहे. नॉर्थ झोनच्या कमकूवत गोलंदाजीसमोर वैभव सूर्यवंशी धमाका करेल असं वाटत होतं. त्याला तशी संधी होती. मात्र तो ६ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ८ धावा करून बाद झाला. आता नॉर्थ झोनला फॉलोऑन दिल्यानं वैभवला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळण्याची शक्यता नाही.
इस्ट झोनने ४६७ धावांचा डोंगर रचला असून नॉर्थ झोनचा पहिला डाव १११ धावात गुंडाळला. दुसऱ्या डावात जरी वैभवला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नसली तरी इशान किशनने वैभवला गोलंदाजी करण्याची संधी दिली. त्याने देखील कर्णधाराने दिलेल्या संधीचं सोनं करत एकाच षटकात २ विकेट्स घेत धमाका केला.
वैभवने सुरूवातीला किशन लिंगडोहला बाद केलं. त्याने ४० चेंडूत २५ धावा केल्या होत्या. तो सेट झाला होता. त्यानंतर वैभवने त्याच षटकात इमलीवती लेमटूरला बाद करत आपली दुसरी शिकार केली. इशान किशनने वैभव सूर्यवंशीकडून ३ षटके टाकून घेतली. त्यात त्याने ११ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.