भाजप सरकारने शनिवारी कोलकाता येथील ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियमबाहेरील फुटबॉलच्या थीमवर आधारित एक शिल्प हटवले आहे. 
स्पोर्ट्स

salt lake stadium football sculpture | कोलकाता स्टेडियमजवळील ममता बॅनर्जींनी डिझाईन केलेले फुटबॉलचे शिल्प जमीनदोस्त

२०१७ 'फिफा अंडर-१७ वर्ल्ड कप'पूर्वी साकारण्‍यात आले होते शिल्‍प

पुढारी वृत्तसेवा

salt lake stadium football sculpture

कोलकाता : भाजप सरकारने शनिवारी कोलकाता येथील ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियमबाहेरील फुटबॉलच्या थीमवर आधारित एक शिल्प हटवले आहे. हे शिल्प स्वतः ममता बॅनर्जी यांनी डिझाईन केले होते. २०१७ मधील 'फिफा अंडर-१७ वर्ल्ड कप'पूर्वी त्याची स्थापना करण्यात आली होती.

तत्‍कालिन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः डिझाईन केले होते शिल्‍प

गेल्या अनेक वर्षांपासून, धडापासून कापलेले दोन पाय आणि त्यावर एक फुटबॉल अशा स्वरूपाचे शिल्प सॉल्ट लेक स्टेडियमची ओळख बनले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः डिझाईन केलेल्या या शिल्पाद्वीप लोकांमध्ये मतभेद होते. अनेकांनी या रचनेला 'कुरुप' आणि 'विचित्र' म्हटले होते. अखेर, क्रीडामंत्री निशीथ प्रामाणिक यांनी हे शिल्प हटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांतच, शनिवारी भाजप सरकारने ते जमीनदोस्त केले.

शिल्‍पावर होता 'विश्व बांगला'चा लोगो

शनिवारी सकाळी, सॉल्ट लेक स्टेडियमच्या व्हीव्हीआयपी (VVIP) गेटजवळील हे शिल्प हटवलेले पाहून स्थानिक नागरिक चकित झाले. याच स्टेडियममध्ये नुकताच फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीचा सामना झाला होता. ममता बॅनर्जी यांच्या कल्पनेतून साकारलेले हे शिल्प २०१७ च्या फिफा अंडर-१७ विश्वचषकापूर्वी बसवण्यात आले होते. या शिल्पावर तत्कालीन तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारचे अधिकृत बोधचिन्ह असलेला 'विश्व बांगला'चा लोगो देखील होता.

सॉल्ट लेक स्टेडियमवरील वादग्रस्त रचना

हे शिल्प अनावरण झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अनेक फुटबॉल चाहत्यांनी याच्या विचित्र डिझाईनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. असे असूनही, ईस्ट बंगाल आणि मोहन बागान यांच्यातील ऐतिहासिक डर्बी सामने आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंचे साक्षीदार असलेल्या या स्टेडियमची ती एक ओळख बनली होती.भाजप नेत्या केया घोष यांनी ट्विट करत म्हटले की, "सॉल्ट लेक स्टेडियमसमोरील ती कुरुप रचना आठवतेय का? दिलेल्या आश्वासनानुसार ती आता हटवण्यात आली आहे."

मुख्‍यमंत्री अधिकारी यांनी दिले होते आदेश

वास्तविक, पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुवेंदु अधिकारी यांनी ही रचना हटवणार असल्याचे सांगितले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालचे क्रीडामंत्री निशीथ प्रामाणिक यांनीही याचा पुनरुच्चार केला होता. अशा ऐतिहासिक स्टेडियमच्या सौंदर्याला ही 'विचित्र' रचना शोभत नसल्याचे त्यांनी म्हटले होते."असा कुरुप पुतळा... दिसायलाही अजिबात चांगला वाटत नाही. त्यामुळे ज्या रचनेला काही अर्थच नाही, असे कुरुप शिल्प आम्ही ठेवणार नाही आणि ते पाडले जाईल," असे प्रामाणिक यांनी १७ मे रोजी माध्‍यमांशी बोलताना सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT