शिरोली दुमाला : थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला कुस्ती स्पर्धेत शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कै. सचिन पाटील कुस्ती संकुलाची कुस्तीपटू कु. कस्तुरी सागर कदम हिने 15 वर्षांखालील 39 किलो वजनी गटातून खेळताना रौप्यपदकाला गवसणी घातली.
कस्तुरी कदम हिने नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आशियाई महिला कुस्ती स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. आशियाई महिला कुस्ती स्पर्धेत उझबेकिस्तानच्या अब्ताबायेवा के या खेळाडूला तिने नमविले. अंतिम सामन्यात तिला जपानच्या सेरा फुरुईचीकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कस्तुरीला कै. सचिन पाटील कुस्ती संकुलातून कुस्तीचे धडे मिळत आहेत. पै. श्री. नितीन पाटी व पै. विकास पाटील तसेच तिचे वडील सागर कदम यांचे मार्गदर्शन लाभले. कस्तुरी कदम ही कै. बा. पुं. पाटील माध्य. व उच्च माध्य. विद्यालय शिरोली दुमालामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे.